ग्लोबल नगरकरांशी लोकल टच
By Admin | Updated: April 2, 2017 12:47 IST2017-04-02T12:47:59+5:302017-04-02T12:47:59+5:30
२३ देशांत विखुरलेल्या नगर जिल्ह्यातील नागरिकांनी ‘ग्लोबल नगरी’ ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत अमेरिकेतील न्यू जर्सी शहरातून नगरकरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला.

ग्लोबल नगरकरांशी लोकल टच
आॅनलाईन लोकमत
अहमदनगर, दि़ २ - जगभरातील तब्बल २३ देशांत विखुरलेल्या नगर जिल्ह्यातील नागरिकांनी ‘ग्लोबल नगरी’ ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत अमेरिकेतील न्यू जर्सी शहरातून नगरमध्ये जमलेल्या जिल्हा प्रशासन व पत्रकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला. आपल्या मातीतील लोकांशी मातृभाषेतून बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नव्हता. ते नगरसाठी किंवा नगरकर त्यांच्यासाठी काय करू शकतात, यावर तासभर चर्चा रंगली.
जिल्हा प्रशासन, प्रेस क्लब व एल अॅण्ड टी कंपनीतर्फे हा संवाद रविवारी सकाळी एल अॅण्ड टीमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, उपजिल्हाधिकारी दत्तात्रय बोरूडे, उपवनसंरक्षक ए. लक्ष्मी, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, एल अॅण्ड टीचे सरव्यवस्थापक अरविंद पारगावकर आदींसह माध्यमांचे संपादक, पत्रकार उपस्थित होते.
नगर जिल्ह्यातून परदेशात गेलेल्या नागरिकांनी ‘ग्लोबल नगरी’ नावाचा ग्रुप बनवला असून, या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात असतात. सुमारे २३ देशांतील २१०जणांच्या या ग्रुपने सामाजिक बांधिलकी म्हणून काही उपक्रम हाती घेतले आहेत. रविवारी झालेल्या या संवादासाठी ५०हून अधिक जण न्यू जर्शी राज्यातील प्रिंस्टन येथे एकत्र आले होते. तेथील किशोर मोरे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
प्रथम ‘ग्लोबल नगरी डॉट ओआरजी’ या संकेतस्थळाचे आॅनलाईन उद्घाटन जिल्हाधिकारी कवडे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर संवाद रंगला. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी प्रशासनाच्या माध्यमातून सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके, विजयसिंह होलम, भूषण देशमुख, अनंत पाटील, महेश देशपांडे आदी पत्रकारांनी या उपक्रमाला व्यापक प्रसिद्धी देण्याचे सांगितले. किशोर मोरे, लता शिंदे, काशिनाथ दादा, संगीता तोडमल, उमेश पवार आदींनी आपल्या मायदेशी साधलेल्या संवादाबद्दल समाधान व्यक्त केले. दोन्हीकडील उपस्थित या संवादाने भावनिक झाले होते.
नगरहून सकाळी नऊ वाजता संवाद सुरू झाला. तेव्हा न्यू जर्सीमध्ये रात्रीचे साडेबारा वाजले होते. आपल्या मातीतून बाहेर पडत जगातील अनेक देशांत नगरकर विखुरले आहेत. त्यांनी आपल्या क्षेत्रात, उद्योगधंद्यात उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे यापुढे परदेशात शिक्षणानिमित्त किंवा इतर कामानिमित्त गेलेल्या नगरकरांसाठी हा ग्रुप बहुपयोगी ठरणार आहे. नगर जिल्ह्यातही अनेक विधायक कामे करणार असल्याचे या ग्रुप सदस्यांनी सांगितले.