स्थानिक व्यापारी मॉल संस्कृतीचा विरोध करणार
By | Updated: December 5, 2020 04:35 IST2020-12-05T04:35:17+5:302020-12-05T04:35:17+5:30
कोपरगाव : महानगरांमध्ये कार्यरत असेलेले विविध मॉल आता ग्रामीण भागात देखील यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येथून पुढे ...

स्थानिक व्यापारी मॉल संस्कृतीचा विरोध करणार
कोपरगाव : महानगरांमध्ये कार्यरत असेलेले विविध मॉल आता ग्रामीण भागात देखील यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येथून पुढे ग्रामीण भागातील किरकोळ विक्रेते मॉल संस्कृतीला प्रखर विरोध करणार असल्याची भूमिका कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व अहमदनगर जिल्ह्यातील संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष काका कोयटे होते.
कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा म्हणाले, मॉल चालक वाढीव एम. आर. पी.चा माल तसेच कमी वजनाचा माल कमी भावात देत असल्याचे दर्शवून ग्राहकांना फसवतात. तसेच ब्रँडेड वस्तू कमी भावात विकतात व इतर मालाच्या भावामध्ये वाजवीपेक्षा जादा भाव घेऊन ग्राहकांची लूट करतात. यापूर्वी १० लाखांच्या पुढे लोकसंख्या असलेल्या शहरात असे मॉल सुरू करण्याची परवानगी होती. हे मॉल आता ग्रामीण भागात देखील फसवणूक करू लागल्याने स्थानिक किरकोळ विक्रेत्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूभीवर महाराष्ट्रातील सर्व व्यापाऱ्यांनी एकजूट करून या कंपन्यांच्या ग्रामीण भागातील प्रवेशाला विरोध केला पाहिजे.
या बैठकीत भारतीय जनता पार्टीचे व्यापारी आघाडी प्रमुख संगमनेरचे शिरीष मुळे, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष नारायण अग्रवाल, केशव भवर, सत्येन मुंदडा, नगरसेवक मंदार पहाडे, नरेंद्र कुर्लेकर, राम थोरे, किरण शिरोडे यांनीही विचार व्यक्त केले. या बैठकीस शिर्डी व्यापारी संघटना प्रमुख लोढा, राहाता येथील चुग धाडीवाल, कोपरगाव तालुका व्यापारी संघर्ष समितीचे अकबर शेख यांच्यासह संगमनेर, शिर्डी, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, बेलापूर या भागांतील व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.