अल्पवयीन मुलीच्या खूनप्रकरणी जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 00:12 IST2016-04-22T00:01:51+5:302016-04-22T00:12:15+5:30
कोपरगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधमास कोपरगाव येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम़ वाय़ ए़ के ़ शेख यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली़

अल्पवयीन मुलीच्या खूनप्रकरणी जन्मठेप
कोपरगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधमास कोपरगाव येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम़ वाय़ ए़ के ़ शेख यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ सुनील ऊर्फ पप्पू सुरेश साळवे असे आरोपीचे नाव आहे़
सरकारी वकील पी़ सी़ धाडिवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्डी येथील बाजारतळ भागात बापू राजाराम कापसे हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात़ त्यांच्या घराशेजारी नाशिक येथून सुनील उर्फ पप्पू सुरेश साळवे हा राहण्यास आला़ २८ डिसेंबर २०१२ रोजी सुनील साळवे याने कापसे यांची नऊ वर्षाची मुलगी छाया हिला पळवून नेले़ त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला़ तिचे प्रेत शिर्डी येथील रेल्वेस्थानक परिसरातील काटवनात फेकून दिले़
छाया घरातून बेपत्ता झाल्याचे कळाल्यानंतर बापू कापसे यांनी साळवे विरूद्ध त्याच दिवशी तक्रार दिली़ परंतु तो फरार झाला होता़ पंधरा दिवसानंतर म्हणजे ११ जानेवारी २०१३ ला त्याला शिर्डी पोलिसांनी अटक केली़ पोलीस कोठडीत त्याने खुनाची कबुली दिली व प्रेत काटवनात फेकल्याचे सांगितले़ त्यानंतर पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांना काटवनातून छायाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला़ मृतदेहाची डि़एऩए़ तपासणी करण्यात आली़ याप्रकरणी १४ साक्षीदार तपासले़ मयत छायाची बहीण सोनाली व डीएनए तपासणी महत्वाचा पुरावा ठरला़ आरोपी हा सिरीयल किलर असून त्याने या पूर्वी अशा प्रकारचे सहा गुन्हे केल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला.