क्षणात उडी फेकल्याने दुचाकीस्वाराचा जीव वाचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:09 IST2021-08-02T04:09:00+5:302021-08-02T04:09:00+5:30
तळेगाव दिघेमार्गे असलेल्या लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याने पावडर मटेरियल गोण्या भरलेला मालट्रक ( एमएच ४५, एएफ ९५७७ ) ...

क्षणात उडी फेकल्याने दुचाकीस्वाराचा जीव वाचला
तळेगाव दिघेमार्गे असलेल्या लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याने पावडर मटेरियल गोण्या भरलेला मालट्रक ( एमएच ४५, एएफ ९५७७ ) नाशिकच्या दिशेने जात होता. दरम्यान, मालट्रक तळेगाव दिघे बाजारतळानजीक आला असता अरुंद रस्ता असल्याने अपघाती वळण पुलावर ट्रक उलटला. त्याचवेळी समोरून दुचाकीवरून किरण रामनाथ दिघे हा युवक गावात येत होता. मात्र मालट्रक अंगावर येत असल्याचे लक्षात येताच त्याने दुचाकीवरून उडी घेतल्याने तो बालंबाल बचावला. दरम्यान, दुचाकी मालट्रकखाली दबली. ओढ्यावरील अरुंद पुलावर अपघात झाल्याने वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.
ग्रामपंचायत सदस्य गणेश दिघे, युवक कार्यकर्ते अमोल दिघे, गणेश गोर्डे, संपतराव दिघे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
......................
पुलाची दुरुस्ती करावी
सदर अपघाती वळण रस्त्यावर व पुलावर यापूर्वीही अपघाताच्या घटना घडलेल्या असून, जीवितहानी झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे आहे.
अन्यथा आंदोलन छेडणार
तळेगाव दिघे बाजारतळा नजीकच्या वळण रस्त्यावरील अपघाती पुलावर वारंवार अपघात होतात. या रस्त्याच्या रुंदीकरण कामासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, ते मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सदर अपघाती वळण रस्त्याची व पुलाची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा युवक कार्यकर्ते अमोल दिघे यांनी दिला आहे.