भाजीपाल्यापेक्षा जीव झाला अधिक स्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:21 IST2021-05-07T04:21:12+5:302021-05-07T04:21:12+5:30
शेवगाव : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, आठवडे बाजार बंद असले शहरात चार ...

भाजीपाल्यापेक्षा जीव झाला अधिक स्वस्त
शेवगाव : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, आठवडे बाजार बंद असले शहरात चार ते पाच ठिकाणी भाजी बाजार सुरू आहे. मात्र, भाजीपाला खरेदीसाठी होणारी दैनंदिन गर्दी कमी होताना दिसत नाही. अनेकांना जीवापेक्षा भाजीपाला, इतर किरकोळ वस्तूंची खरेदी महत्त्वाची असल्याचे दिसून येत आहे.
केवळ ताजा भाजीपाला खरेदीसाठी नागरिक दररोज बाजारात चकरा मारत आहेत. संसर्गाची साखळी तुटण्याऐवजी कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
‘ब्रेक द चेन’अंतर्गत केवळ अत्यावश्यक सेवांसाठी सकाळी अकरापर्यंत वेळ देण्यात आली आहे. या वेळेत भाजीपाला, फळे विक्री करता येत आहेत. परंतु, या अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेकजण रिकामे फिरत आहेत. एकीकडे कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे, तर दुसरीकडे आवश्यक नसलेल्या कामासाठी नागरिक रस्त्यांवर गर्दी करीत आहेत. शहरातील बाजारपेठा, पैठणरोड, पोलीस स्टेशन परिसर, मिरी रोड, नेवासा रोड आदी भागात नियमित गर्दी पाहायला मिळते.
अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, दुकानाचे शटर अलगद वर करून ग्राहकांना हवे ते दिले जात आहे, तर काही दुकानांच्या मागील दारातून सर्रासपणे वस्तूंची देवाणघेवाण सुरू आहे. त्यातच मुख्याधिकारी यांची बदली झाल्याने ते पद सध्या रिक्त आहे.
---
अनेकांच्या गावात चकरा...
संचार बंदीमुळे घरी बसावे लागत असल्याने काही नागरिक घराची रंगरंगोटी, बांधकाम आदींसह किरकोळ दुरुस्तीची कामे आटोपण्याच्या तयारीत आहेत. परंतु, अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने बंद आहेत. यामुळे शहरातील रस्त्यांवर या कामाचे साहित्य मिळेल, असे दुकान उघडे मिळते का? यासाठी अनेकांच्या चकरा सुरू असतात.
---
०६ शेवगाव बाजार
शेवगाव शहरात सकाळी अशी गर्दी होते.