अहमदनगर :
पेन्शन शिक्षकांचा हक्क आहे. ती मिळवण्याच्या लढ्यात मी तुमच्या पाठीशी राहील. डिसीपीएसधारक शिक्षकांचे जिल्हा पातळीवरील प्रश्न आपण प्राधान्याने सोडवू, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी जुनी पेन्शन हक्क शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
जिल्हा परिषदेत शेळके यांच्या हस्ते जुनी पेन्शन हक्क समितीचे जिल्हाध्यक्ष कैलास ठाणगे, कार्याध्यक्ष अनिल शिंदे व दत्ता राठोड यांचा सत्कार केला. अंशदायी पेन्शन योजनेच्या दोन वर्षाच्या कपातीच्या पावत्या अचूक हिशेबासहित त्वरित मिळाव्यात, जिल्हा बदलून आलेल्या शिक्षकांच्या अंशदायी पेन्शनचा रकमा आधीच्या जिल्हा परिषदेकडून तातडीने मागवून त्यांच्या मूळ खात्यावर जमा कराव्यात, चुकींच्या पावत्यांमध्ये दुरूस्ती व्हावी, वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्राप्त प्रस्ताव प्राधान्याने मंजूर करावेत, मंजूर वैद्यकीय बिलांच्या रकमा अदा कराव्यात, पदावनती घेणाऱ्या शिक्षकांना सोयीच्या शाळा द्याव्यात, इतर जिल्ह्यात बदली झालेल्या उर्दू व मराठी माध्यमाच्या शिक्षकांना कार्यमुक्त करावे आदी मागण्यांचे निवेदन उपाध्यक्ष शेळके, शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, लेखाधिकारी रमेश कासार यांना देण्यात आले. यावेळेस सांस्कृतिक समितीचे राज्याध्यक्ष डॉ. संजय कळमकर, अशोक मोरे, पोपट फुंदे, जावेद सय्यद, सुनील नरसाळे, दत्ता जाधव, मधुकर मैड, ऋषी गोरे, विजय जाधव, साईकुमार शिंदे, शहाराम येरकळ, शाम राठोड, किशोर राठोड उपस्थित होते.