झेडपीच्या शाळेत जाऊ.. मौलिक शिक्षण घेऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST2021-07-02T04:14:50+5:302021-07-02T04:14:50+5:30
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे राजेंद्र पोटे व मंगल पोटे या शिक्षक दांपत्याने ...

झेडपीच्या शाळेत जाऊ.. मौलिक शिक्षण घेऊ
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे राजेंद्र पोटे व मंगल पोटे या शिक्षक दांपत्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या माध्यमातून राबवले जाणारे शैक्षणिक उपक्रमांचे ‘झेडपीच्या शाळेत जाऊ.. मौलिक शिक्षण घेऊ’ हे गौरवगीत तयार करून ते चित्रीत करण्याचा शैक्षणिक उपक्रम राबविला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या चित्रीत केलेल्या गीताचे फीत कापून प्रसारण केले.
शिक्षक राजेंद्र पोटे यांनी गीत लेखन केले असून मंगल पोटे यांनी गायन केले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या माध्यमातून समाजातील विविध कुटुंबातून शाळेत येणारी मुले, शाळेत मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहार, संगणक शिक्षण, मूल्यसंस्कार, हसत खेळत मौलिक शिक्षण, गायन, वादन, श्रमसंस्कार हे सर्व उपक्रम उत्तमरित्या राबविले जातात. हेच या झेडपीच्या शाळेत जाऊ.. या गीतामधून ओंकार पोटे याने चित्रित केले आहे.
झेडपीच्या शाळा शैक्षणिक गुणवत्तेत अव्वल असून पालकांनी आपल्या पाल्यांचा झेडपीच्या शाळेतच प्रवेश घ्यावा. यादृष्टीने या गीताची रचना केल्याचे राजेंद्र पोटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या गीतासाठी संजय पठाडे, गणेश भोसले, मुख्याध्यापिका शोभा साबळे, पुष्पा ठुबे, ओंकार पोटे, अविनाश आढाव, ग्रामस्थ, शिक्षण विभाग यांचे विशेष सहकार्य लाभले. यापूर्वी पोटे यांनी कोरोनावर आधारित प्रबोधनपर गीतांचे लेखन करून समाज जागृती केली आहे.
---
ग्रामीण भागातील चिमुकल्यांच्या भावविश्वाला आकार देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा मोफत शिक्षण देताना सुसंस्कारित पिढी घडविणारी ज्ञानमंदिरे आहेत. प्रशासकीय व इतर क्षेत्रात अधिकार पदावर कार्यरत असणारे अधिकारी हे झेडपीच्याच शाळेत शिकून मोठे झाले आहेत. पोटे दांपत्याने तयार केलेले प्राथमिक शाळा गौरव गीतातून दाखविलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत.
-अण्णा हजारे,
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
----
पोटे दांपत्याने जिल्हा परिषद शाळांचे विविध उपक्रम गीताच्या माध्यमातून शब्दबद्ध करून त्याचे गायन केले. हे काम कौतुकास्पद आहे. हा शैक्षणिक उपक्रम सर्वांसाठी अनुकरणीय आहे.
-राजेंद्र क्षीरसागर,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
----
०१ अरणगाव दुमाला
अरणगाव दुमाला शाळेतील शिक्षकाने तयार केेलेल्या गीताच्या प्रसारणाचा प्रारंभ करताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे.
300621\0842img_20210630_083226.jpg
श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव येथील प्राथमिक शाळेतील पोटे शिक्षक दांपत्याने तयार केलेल्या शाळा गौरव गीताचे अनावरण करताना पद्मभूषण डॉ .अण्णासाहेब हजारे . ( छायाचित्र - संदीप घावटे )