चला.. ‘जलमित्र’ होऊ या़

By Admin | Updated: May 8, 2016 23:52 IST2016-05-08T23:43:16+5:302016-05-08T23:52:04+5:30

अहमदनगर : ‘लोकमत’चे वाचक आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या जलमित्र अभियानाचा रविवारी औरंगाबाद रोडवरील हॉटेल पंचवटी येथे शुभारंभ करण्यात आला़

Let's go 'Jalmitra' | चला.. ‘जलमित्र’ होऊ या़

चला.. ‘जलमित्र’ होऊ या़

अहमदनगर : ‘लोकमत’चे वाचक आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या जलमित्र अभियानाचा रविवारी औरंगाबाद रोडवरील हॉटेल पंचवटी येथे शुभारंभ करण्यात आला़ यावेळी हॉटेलचे संचालक सुनील काळे, माजी उपमहापौर गीतांजली काळे, हॉटेलचे व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते़
सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता वर्तमान आणि भविष्यासाठी पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविणे गरजेचे असून, नागरिकांमध्ये पाणी बचतीबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘लोकमत जलमित्र अभियान’ राबविण्यात येत आहे़ पहिल्या टप्प्यात शहरातील विविध हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन आणि मेसमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे़ हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या ग्राहकांना प्रथम अर्धा ग्लास पाणी द्यावे, नंतर पिण्यासाठी लागेल तेवढेच पाणी देण्यात यावे़
ग्राहकांच्या ग्लासमधील उरलेले पाणी फेकून न देता हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॅरलमध्ये (पाण्याची टाकी) टाकण्यात यावे़ तसेच त्या साचलेल्या पाण्याचा पुनर्वापर करून पाणी बचत करावी, ही या अभियानातील संकल्पना आहे़ हॉटेल पंचवटीमध्ये काम करणारे कर्मचारी व व्यवस्थापक यांना जलमित्र अभियान या मोहिमेची संकल्पना स्पष्ट करत दररोज कशी पाणी बचत करता येईल, या विषयी प्रबोधन करण्यात आले़ तसेच हॉटेलमध्ये जलमित्र अभियानाचे पोस्टर लावण्यात आले़ ‘लोकमत’च्या या मोहिमेला हॉटेल संचालक व कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत पाणीबचत करणार असल्याचे ‘लोकमत’जलमित्र मोहिमेतील सदस्यांना आश्वासन दिले़ ‘लोकमत जलमित्र’ या अभियानाला शहरातील हॉटेल व्यावसायिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़
सध्या निर्माण झालेली दुष्काळाची धग पाहता पाणीबचत ही काळाजी गरज बनली असून, नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे़ ‘लोकमत’ने सुरू केलेल्या जलमित्र अभियानामुळे नागरिकांमध्ये मोठी जनजागृती होईल़ आम्ही पाणीबचतीची ही मोहीम काही दिवसांसाठी नव्हे तर कायमस्वरुपी राबविणार आहोत.हॉटेलमधील कर्मचारीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतील़
-सुनील काळे, संचालक, हॉटेल पंचवटी.
जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळस्थिती असून, नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे़ अशा परिस्थितीत पाणीबचत हाच सर्वांत मोठा उपाय आहे़ पाऊस लवकर झाला नाही तर येणाऱ्या काही दिवसांत पाणीटंचाई आणखी वाढणार आहे़ त्यामुळे पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविणे गरजेचे आहे़ ‘लोकमत’ने सुरू केलेले जलमित्र अभियान एक चांगली सुरुवात असून, यातून नक्कीच चांगले फलित निघेल़
-गीतांजली काळे, माजी उपमहापौर

Web Title: Let's go 'Jalmitra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.