देवदैठणमध्ये बिबटयाचे दर्शन; पाच मिनिटाच्या अंतराने मायलेकी बचावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 11:58 IST2021-01-17T11:57:35+5:302021-01-17T11:58:33+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील आमराईमळ्यात तरूणांना शनिवारी संध्याकाळी बिबटयाचे दर्शन झाले .बिबटया दिसण्यापूर्वी पाच मिनिटे अगोदर माय- लेकी त्या जागेवरून निघून गेल्याने त्या बचावल्या व मोठा अनर्थ टळला.

देवदैठणमध्ये बिबटयाचे दर्शन; पाच मिनिटाच्या अंतराने मायलेकी बचावल्या
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील आमराईमळ्यात तरूणांना शनिवारी संध्याकाळी बिबटयाचे दर्शन झाले .बिबटया दिसण्यापूर्वी पाच मिनिटे अगोदर माय- लेकी त्या जागेवरून निघून गेल्याने त्या बचावल्या व मोठा अनर्थ टळला. बिबट्यामुळे परीसरात घबराट निर्माण झाली आहे.
१६ रोजी संध्याकाळी सहा वाजता संजय दत्तू कौठाळे यांच्या शेतात अरूण दादाभाऊ कौठाळे हे ट्रॅक्टरने मका पेरणी करत होते. शेजारील वसंत कौठाळे यांच्या शेतात वसंत यांची पत्नी अनिता व लहान मुलगी प्रज्ञा ह्या कडवळ कापून नुकत्याच घरी गेल्या होत्या. काही वेळातच अनिता यांनी कापलेल्या कडवळाच्या पेंढीवर बिबटया उभा असलेला अरूण कौठाळे यांनी पाहिला. थोडया वेळाच्या अंतराने या माय-लेकीवरील संकट टळले होते. जर या मायलेकी त्याच जागेवर असत्यातर अनर्थ झाला असता.
बिबट्या पाहताच अरूण कौठाळे, संजय कौठाळे, प्रकाश कौठाळे, रविंद्र कौठाळे यांनी ट्रॅक्टर बिबटयाच्या दिशेने वळवला. त्यानंतर बिबट्याने तेथून दुसऱ्या शेतात धूम ठोकली. यापूर्वी वाघमारे वस्ती परिसरात दिपक कौठाळे तसेच ग्रामस्थांनी बिबटया पाहिला आहे. त्यामुळे या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्ताची मागणी होत आहे.