राहुरी : सडे परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याच्या दर्शनाने दहशत पसरली होती. परंतु गुरूवारी पहाटे एक बिबट्या पिंजऱ्यात अलगत सापडला. इतर दोन बिबटे मात्र फरार झाले़ पकडलेल्या बिबट्याला डिग्रस येथील नर्सरीत दाखल करण्यात आले आहे. सडे येथील दत्तात्रय बाळासाहेब कदम यांच्या शेतात बिबट्या जेरबंद झाला़ सडे परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी वन खात्याकडे अर्जुनराव पानसंबळ व अनिल पवार, दत्तात्रय कदम, राजेंद्र पानसंबळ, संजय पानसंबळ, आऱ डी़ धोंडे आदी ग्रामस्थांनी केली होती. सडे परिसरात यापूर्वी बिबट्याने कोंबड्या, शेळ्यांचा फडशा पाडला होता़ शेतकऱ्यांतही बिबट्याची दहशत असल्याने ते काम करण्यासाठी शेतात जात नव्हते.या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी वन खात्याकडे पिंजऱ्याची मागणी केली होती़ त्यात गुरूवरी बिबट्या सापडला. या घटनेची माहिती समजताच गावकऱ्यांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली़ वन खात्याचे कर्मचारी खराडे यांनी जेरबंद बिबट्याला डिग्रस येथे नेले़ आणखी दोन बिबट्यांनाही असेच पकडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बिबट्या जेरबंद
By admin | Updated: December 30, 2022 15:32 IST