बिबट्याची झुंज : दोन्ही बिबटे ठार, ‘या’ तालुक्यात घडली घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 16:42 IST2021-01-18T16:41:19+5:302021-01-18T16:42:12+5:30
दोन बिबट्यांच्या झालेल्या झुंजीत दोन्ही बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना अकोले तालुक्यातील लहित शिवारात रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.

बिबट्याची झुंज : दोन्ही बिबटे ठार, ‘या’ तालुक्यात घडली घटना
राजूर : दोन बिबट्यांच्या झालेल्या झुंजीत दोन्ही बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना अकोले तालुक्यातील लहित शिवारात रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.
अकोलेवनविभागाकडून अधिक मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री एकच्या सुमारास लहित शिवारातील एका उसाचा क्षेत्रात एक सात ते आठ महिन्याचा मादी व एक ते सव्वा वषार्चा नर यांच्यात झुंज सुरू होती. यावेळी त्यांचा डरकाळ्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारे जागे झाले. मात्र समोर जाण्यास कोणीही तयार झाला नाही. यावेळी इतर एक बिबट्या त्या ठिकाणी असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
सोमवारी सकाळी शेजारील लोकांना हे दोन्ही बिबटे मृत झाल्याचे आढळून आले. ही माहिती तेथील लोकांनी अकोले वनविभागास कळविली. घटनेची माहिती मिळताच अकोल्याच्या वनक्षेत्रपाल भाग्यश्री पोले यांनी ही उपविभागीय वनाधिकारी जी. ए. झोळे यांना दिली.
उपविभागीय वनाधिकारी झोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल पोले, वनरक्षक विजय जावळे, वनपाल घोडसरे घटनास्थळी जाऊन घटनेची प्राथमिक माहिती तेथील स्थानिकांकडून घेत या दोन्ही बिबट्यांचा पंचनामा केला.
पशुवैद्यकीय अधिकारी यांनी या दोन्ही बिबट्यांचे शवविच्छेदन केले. यात या दोन्ही बिबट्यांच्या अंगावर जखमा झाल्या असल्याचे दिसून आले. शवविच्छेदनानंतर त्यांचे काही नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल पोले यांनी सांगितले.