स्थायी समितीला माहिती न दिल्यास कायदेशीर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:16 IST2021-06-26T04:16:07+5:302021-06-26T04:16:07+5:30

अहमदनगर : महापालिकेतील पाच ते पंचवीस लाखांपर्यंतची माहिती स्थायी समितीला सादर करणे बंधनकारक असून, माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर ...

Legal action if the Standing Committee is not informed | स्थायी समितीला माहिती न दिल्यास कायदेशीर कारवाई

स्थायी समितीला माहिती न दिल्यास कायदेशीर कारवाई

अहमदनगर : महापालिकेतील पाच ते पंचवीस लाखांपर्यंतची माहिती स्थायी समितीला सादर करणे बंधनकारक असून, माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सभापती अविनाश घुले यांनी सभेत दिला.

सभापती अविनाश घुले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी स्थायी समितीची सभा झाली. सदस्य ऑनलाईन सभेत सहभागी झाले होते. प्रशासकीय निर्णयांची माहिती महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतींना कळविणे बंधनकारक आहे. परंतु, प्रशासनाकडून स्थायी समितीला माहिती पाठविली जात नसल्याबाबत सदस्य सागर बोरुडे यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, कुठलीही माहिती स्थायी समितीला पाठविणे बंधनकारक असताना माहिती मागवून ती वेळेवर मिळत नाही. हा स्थायी समितीचा हक्कभंग आहे, असा गंभीर आरोप बोरुडे यांनी केला. सभापती घुले यांनीही माहिती मिळत नसल्याबाबत प्रशासनाला जाब विचारला. घुले म्हणाले, यापूर्वी सभापती असताना प्रशासनाला पत्र दिलेले होते. महापालिका अधिनियम ७३ ड नुसार स्थायी समितीला माहिती देणे बंधनकारक आहे. परंतु, प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असून, यापुढे माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा घुले यांनी यावेळी दिला.

.....

आयुक्तांच्या गैरहजरीवरून प्रशासन धारेवर

महापालिका स्थायी समिती सभेला आयुक्त हजर राहात नाहीत. मागील तीन सभांना आयुक्त गैरहजर होते, याबाबत अधिनियमात काय तरतूद आहे, असा प्रश्न सागर बोरुडे यांनी उपस्थित केला. त्यावर आयुक्तांच्या वतीने उपायुक्त हजर असतात. आयुक्तांना सभागृहात हजर राहणे बंधनकारक नाही. परंतु, ते हजर राहू शकतात, असा खुलासा नगरसचिव एस. बी. तडवी यांनी केला. त्यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी पुढील सभेला आयुक्तांनी स्वत: हजर राहावे, अशी आग्रही मागणी केली.

...

ऑक्सिजन प्रकल्प ४५ दिवसांत पूर्ण करण्याचा आदेश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावेडी अमरधाम येथे प्रस्तावित आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यास स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. ही मंजुरी देण्यापूर्वी प्रकल्पाचे काम किती दिवसांत पूर्ण होईल, याची सभागृहाला माहिती मिळावी, अशी मागणी सदस्य रवींद्र बारस्कर यांनी केली. यावर हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला ४५ दिवसांची मुदत दिली आहे, असे प्रकल्प प्रमुख आर. जी. मेहत्रे यांनी सांगितले. ठेकेदाराला दीड महिन्याचा कालावधी असला तरी हे काम तांत्रिक बाबींसाठी अडवू नका. कोरोनाची तिसरी लाट कोणत्याही क्षणी येऊ शकते. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी कामाचा नियमित अहवाल स्थायी समितीला सादर करावा, अशा सूचना बारस्कर यांनी केल्या. त्यावर सभापती घुले म्हणाले, सभा संपल्यानंतर ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देऊन तत्काळ काम सुरू करण्याचा आदेश देण्यात येईल.

....

बुरुडगाव कचरा डेपोतील वृक्ष लागवडीची मागविली माहिती

बुरुडगाव येथील कचरा डेपोत मध्यंतरी वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्ष लागवडीची बिलेही ठेकेदाराला दिली गेली. परंतु, तिथे झाडे आहेत का, असा सवाल सागर बोरुडे यांनी उपस्थित केला. त्यावर प्रशासनाकडून प्रभारी उद्यान विभागप्रमुख मेहर लहारे यांनी आता फाईल सोबत आणली नाही, असे उत्तर दिले. ही सर्व माहिती सर्वसाधारण सभेत सादर करा, अशी सूचना सभापती घुले यांनी केली.

Web Title: Legal action if the Standing Committee is not informed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.