मोठ्या नोकरीची संधी सोडून ‘ते’ रमले शेतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:21 IST2021-03-27T04:21:10+5:302021-03-27T04:21:10+5:30
पिंपळगाव माळवी : एकतीस वर्षे मुंबई पोलीस दलामध्ये पोलीस निरीक्षकपदी सेवा केली. सेवानिवृत्तीनंतर मुंबईत एका मोठ्या कंपनीत नोकरीची चालून ...

मोठ्या नोकरीची संधी सोडून ‘ते’ रमले शेतीत
पिंपळगाव माळवी : एकतीस वर्षे मुंबई पोलीस दलामध्ये पोलीस निरीक्षकपदी सेवा केली. सेवानिवृत्तीनंतर मुंबईत एका मोठ्या कंपनीत नोकरीची चालून आलेली संधीही सोडली. त्यानंतर गावाकडची ओढ स्वस्थ बसू देईना. त्यामुळेच गावाकडे येऊन ‘त्यांनी’ विविध प्रकारची आंतरपिके घेऊन शेती फुलविली.
नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील तुकाराम एकनाथ भोसले, असे त्या सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. पाेलीस निरीक्षक पदावरून ते २०१२ साली सेवानिवृत्त झाले. शेतीची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यामुळेच त्यांनी आपली एक एकर शेती फुलविण्याचा निश्चय केला. त्यांनी एक एकर शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नंदनवन फुलविले आहे. या शेतीमध्ये त्यांनी विविध प्रकारची मिश्र पिके घेतली आहेत. त्यांच्या शेतीत ४६५ सीताफळ झाडे, २०० साग, पाच हजार मिरचीची झाडे, १० चिंचेची झाडे, यासह आंतरपीक म्हणून कांदे, लसूण, भुईमुगाचे पीक घेतले आहे. सध्या त्यांच्या शेतातील मिरचीचा तोडा चालू असून, दररोज एक क्विंटल हिरवी मिरची उत्पन्न मिळत असून, त्यास चाळीस रुपये किलो हा दर मिळतो. लहानपणापासून शेतीची आवड असल्यामुळे या वयातदेखील ते सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत स्वतः कष्ट करतात. त्यांना या शेतीकामांमध्ये त्यांच्या पत्नी उज्ज्वला यांची मोलाची साथ मिळत आहे.
---
लहानपणापासूनच मला शेतीची आवड आहे. ग्रामीण भागातील वातावरण प्रदूषणमुक्त असून, आरोग्यास पोषक असल्यामुळे मी दिवसभर शेतीमध्ये रमतो. उत्तम आरोग्य व आर्थिक उत्पन्नही मिळते.
-तुकाराम भोसले,
सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक
---
२६ पिंपळगाव माळवी
शेतातील मिरचीचा तोडा करताना पिंपळगाव माळवी येथील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक तुकाराम भोसले.