कुकडीच्या पाणी प्रश्नावर नेत्यांची एकमेकांवर निशाणेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST2021-09-02T04:46:27+5:302021-09-02T04:46:27+5:30
पाणी प्रश्नावर माध्यमांशी बोलताना शेलार म्हणाले, मी श्रेय मिळावे म्हणून कोणतेच काम केले नाही. कुकडीच्या पाणीप्रश्नी काही जण माझ्या ...

कुकडीच्या पाणी प्रश्नावर नेत्यांची एकमेकांवर निशाणेबाजी
पाणी प्रश्नावर माध्यमांशी बोलताना शेलार म्हणाले, मी श्रेय मिळावे म्हणून कोणतेच काम केले नाही. कुकडीच्या पाणीप्रश्नी काही जण माझ्या भूमिकेविषयी संशय निर्माण करीत आहेत. या प्रश्नावर बोलताना प्रत्येकाने अभ्यासपूर्णच बोलावे, असा चिमटा शेलार यांनी नाव न घेता बाळासाहेब नाहाटा यांना घेतला. डिंबे ते येडगाव कालव्याचा आराखडा चुकला आहे. त्यामुळे याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटणार आहे. गॅस पाईपलाईन ठेकेदारास कोणी किती लाख मागितले याची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत. कुणी हवेत गोळीबार करू नयेत, असे आवाहनही शेलार यांनी केले.
...............
पवारांना भेटण्याऐवजी आडवे येणाऱ्यांना भेटा : पाचपुतेंचा प्रतिटोला
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कुकडीच्या ३ हजार ९५० कोटी रुपयांच्या सुधारित प्रकल्प आराखड्यास मंजुरी दिली. यामध्ये डिंबे, माणिकडोह जोड बोगद्याचा समावेश होता. बोगद्याच्या कामासंदर्भात शरद पवार यांना भेटण्याऐवजी ज्यांनी बोगद्याच्या कामात आडवे पाय घातले आहेत त्यांना शेलारांनी भेटावे, असा प्रतिटोला आमदार बबनराव पाचपुते यांनी लगावला. पाचपुते पुढे म्हणाले, जनतेने सात वेळा आमदार केले आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी काम करत आहे. पण ज्यांना साधे ग्रामपंचायत सदस्य होता आले नाही त्यांच्यावर अधिक काय बोलायचे असा प्रश्न आहे. कुकडीच्या पाण्यासाठी मला जबाबदार धरता हे बरोबर आहे. मी ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार आहे.
........................
नाहाटांचा शेलारांवर निशाणा
श्रीगोंदा तालुक्यात कुकडी कालवा सल्लागार समितीचे तीन सदस्य आहेत तरी श्रीगोंद्याला पाणी मिळाले नाही. या विषयावर मी तर घनश्याम शेलार यांना दोषच देत नाही. ते तर आमदार रोहित पवार यांनी शिफारस केलेले कुकडी कालवा सल्लागार समितीचे सदस्य आहेत. त्यांनी करेक्ट कार्यक्रम केला, अशी टीका बाळासाहेब नाहाटा यांनी माध्यमांशी बोलताना केली. काही जण माझ्यामुळेच पाणी प्रश्न सुटला असे श्रेय घेत आहेत. मात्र, लाभक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. याला आमदार पाचपुतेही तेवढेच जबाबदार आहेत. गॅस पाईपलाईन ठेकेदारास काहींनी लाखोंच्या खंडणीसाठी हतबल केले आहे. याबाबत आपण ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती देऊन बुरखा फाडणार असल्याचा इशारा यावेळी नाहाटा यांनी दिला.