आघाडी की स्वबळ...कार्यकर्त्यांचा संभ्रम संपवा !
By Admin | Updated: June 5, 2014 00:07 IST2014-06-04T23:19:44+5:302014-06-05T00:07:57+5:30
अहमदनगर : काँग्रेसने पराभवाबाबत चिंतन केले आहे. त्याची कारणमीमांसा झाल्याने उपाययोजना सुरू आहेत.
आघाडी की स्वबळ...कार्यकर्त्यांचा संभ्रम संपवा !
अहमदनगर : काँग्रेसने पराभवाबाबत चिंतन केले आहे. त्याची कारणमीमांसा झाल्याने उपाययोजना सुरू आहेत. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी करून लढायचे की स्वबळावर हे पक्षश्रेष्ठींनी ठरविले पाहिजे. लोकसभा किंवा विधानसभा पातळीवर आघाडी असते. मात्र स्थानिक पातळीवर कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध लढतात. यातून संभ्रम वाढतो. त्यामुळे यापुढे राजकारण आघाडीचे करायचे की स्वबळाचे हे एकदाचे ठरवून टाकण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट मत युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ कार्यालयास तांबे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी संपादकीय विभागाशी युवक काँग्रेसचे धोरण, निवडणुकीबाबत रणनीती, पराभवाबाबत उपाययोजना आदी विषयांवर गप्पा मारल्या. पराभवाची कारणे सापडूनही त्याच्यावर उपाययोजना न केल्यास यश मिळणे कठीण आहे. दोन्ही काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकमेकांविरूद्ध लढतात. त्यातून कार्यकर्त्यांत कटुता निर्माण होते. आणि ऐन निवडणुकीत नेते मनोमीलनाचे आवाहन करतात. त्यावेळी मनोमीलन कसे होईल, असा सवालही तांबे यांनी उपस्थित केला. आगामी निवडणुकीसाठी आताच रणनीती ठरली पाहिजे, असे ते म्हणाले. काँग्रेसच्या पराभवाबाबत सर्वांनी आपापल्या पद्धतीने विश्लेषण केले आहे. मात्र, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या चिंतन बैठकीनंतर उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. युवक व एनएसयुआय (विद्यार्थी संघटना)यांचे भविष्यातील धोरण काय असावे हे ठरविण्यासाठी देशपातळीवर एक समिती नेमली आहे. आठ दिवसांत हे धोरण ठरेल. युवक काँग्रेसमध्ये ठराविक काळानंतरच नेतृत्वाची संधी मिळत असल्याने संघटना वाढीस मर्यादा येतात, असेही त्यांनी मान्य केले. दरम्यान, पक्षाने आदेश दिल्यास अहमदनगर शहर काय कोठूनही विधानसभेची उमेदवारी करण्यास तयार असल्याचे त्यांनी शेवटी सांगीतले.(प्रतिनिधी)यूपीए सरकारने अनेक लोककल्याणाच्या योजना आणल्या. मात्र, त्याचे मार्केटिंग करता आले नाही. आम्ही प्रशासनावर अवलंबून राहिलो. कार्यकर्ता म्हणून कोणी कामच केले नाही. भाजपाने प्रचाराची प्रत्येक यंत्रणा वापरली. आरएसएसनेही मोठी भूमिका बजावली. आमच्या बोलण्यातील, वागण्यातील मुजोरी नडली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत विसंवाद झाला, त्यातून पराभव ओढावला, असे आज्यच्या स्थितीचे विश्लेषण करता येईल. मात्र, मोदींनी अवास्तव स्वप्न दाखविली आहेत. ती पूर्ण न झाल्यास लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडेल. ते देशासाठी घातक ठरेल, अशी भितीही तांबेंनी व्यक्त केली.आगामी निवडणुकीत तरूणांना ३० टक्के जागांवर उमेदवारी दिली जाणार आहे. विधानसभा आणि लोकसभा हे दोन्ही फॅक्टर वेगळे आहेत. तरूणांना संधी दिल्यास नक्कीच काँग्रेसला यश मिळेल. रणनीती ठरविल्यास कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर होईल. नगर जिल्ह्यात काँग्रेसला ५, राष्ट्रवादी ७ असे सूत्र आहे. एक जागा त्यांच्याकडे जास्त आहे. दोघांचीही ताकद सारखी असल्याने दोघांना प्रत्येकी ६ जागा पाहिजे, अशी मागणीही तांबे यांनी केली.