सरकार आल्यानंतर एलबीटी हद्दपार

By Admin | Updated: October 2, 2014 00:33 IST2014-10-01T23:54:56+5:302014-10-02T00:33:51+5:30

अहमदनगर : भाजपाचे सरकार आल्यानंतर राज्यातून एलबीटी हद्दपार करू, असे आश्वासन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत दिले.

LBT expatriates after the government came | सरकार आल्यानंतर एलबीटी हद्दपार

सरकार आल्यानंतर एलबीटी हद्दपार

अहमदनगर : आघाडी सरकारने शहरांकडे पैसे कमविण्याचे मशिन म्हणून पाहिले. त्यामुळेच राज्यातील शहरे बकाल झाली आहेत. जकात रद्द करून मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांच्या मानगुटीवर एलबीटीचे भूत बसविले. त्यांच्या ‘इगो’मुळे एलबीटी रद्द झाला नाही. भाजपाचे सरकार आल्यानंतर राज्यातून एलबीटी हद्दपार करू, असे आश्वासन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत दिले.
भाजपाचे नगर शहर मतदारसंघातील उमेद्वार अ‍ॅड. अभय आगरकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, संघटन मंत्री विठ्ठल चाटे, सुनील रामदासी आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर नगर शहराच्या विकास आराखड्यासाठी राज्य आणि केंद्राकडून पैसा उपलब्ध करून दिला जाईल. परदेशातील गुंतवणूकही नगरमध्ये आणता येईल. पिण्याच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे आॅडिट होईल.
उद्योग, व्यवसाय आणि व्यापाराला चालना देऊन शहराची दुरावस्था बदलण्यासाठी प्रयत्न केला जाईल. नगरच्या तरुणांना रोजगारासाठी पुणे-मुंबईला जावे लागले. त्यामुळे नगर पेन्शनरांचे शहर झाले आहे. शिक्षण हा हजारो कोटी रुपयांचा उद्योग बनला आहे. महर्षी गेले आता डिग्रीचे कारखाने काढून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सम्राट झाले आहेत.
साठ वर्षे ज्यांनी देशाला लुटले ते शंभर दिवसांचा हिशेब मागत आहेत. आघाडी सरकारने राज्याला फक्त बेरोजगारी, गुन्हेगारी आणि आत्महत्या दिल्या आहेत. मोदी सरकार आल्यापासून महगाईवर काबू ठेवण्यात यश आले आहे. जगाचे नेतृत्त्व करण्याची क्षमता असलेला पंतप्रधान देशाला मिळाला आहे, असे सांगून फडवणीस यांनी त्यांच्या भाषणात मोदी सरकारचे व्हीजन सविस्तरपणे मांडले. (प्रतिनिधी)
काँग्रेस ‘लुना पार्टी’
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फोडताना राष्ट्रवादी काँग्रेस नॅनो पार्टी होईल, असे भाकित फडणवीस यांनी नगरमध्ये केले होते. त्याची आठवण सांगताना फडणवीस म्हणाले, नगरमध्ये जे बोलले जाते ते खरे होते. राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेत इनोव्हाची ‘नॅनो पार्टी’ झाली, तर काँग्रेस ‘लुना पार्टी’झाली. आता नगरचा आमदारही भाजपाचाच असेल.

Web Title: LBT expatriates after the government came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.