शहीद विघावेंना अखेरचा निरोप
By Admin | Updated: July 5, 2023 11:08 IST2014-05-13T00:52:15+5:302023-07-05T11:08:57+5:30
श्रीरामपूर : नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भू-सुरूंगाच्या स्फोटात शहीद झालेले दीपक रतन विघावे (वय ३७) यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद विघावेंना अखेरचा निरोप
श्रीरामपूर : गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी या नक्षलवादी परिसरात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भू-सुरूंगाच्या स्फोटात शहीद झालेले खंडाळा (ता. श्रीरामपूर) येथील पोलीस जवान दीपक रतन विघावे (वय ३७) यांच्यावर सरकारी इतमामात त्यांच्या खंडाळा गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने त्यांना अखेरची सलामी देण्यात आली. सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अशोकनगर फाटा येथील हेलिपॅडवर त्यांचे पार्थिव आणण्यात आले. तेथे आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे, अपर अधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे, उपअधीक्षक अंबादास गांगुर्डे, निरीक्षक सुरेश सपकाळे, कैलास फुंडकर, माजी सभापती सुनीता गायकवाड, उपसभापती कैलास कणसे, काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन गुजर, जि.प.सदस्य बाबासाहेब दिघे, सिद्धार्थ मुरकुटे, सोपान राऊत हजर होते. श्रीरामपूर नगरपालिकेच्या सजविलेल्या रूग्णवाहिकेतून शहीद जवान विघावेंचे पार्थिव हेलिपॅडवरुन श्रीरामपूर शहरात आणण्यात आले. शहरातून मिरवणूक काढून नंतर खंडाळा येथे ते नेण्यात आले. श्रीरामपूर ते खंडाळा रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वीर पिता रतन विघावे, वीरपत्नी ज्योती, त्यांचा मुलगा यश, मुलगी खुशी यांच्यासह जवळच्या आप्तेष्ठांना पार्थिव पाहून हुंदका आवरणे कठीण झाले होते. खंडाळा गावातून मिरविल्यानंतर पार्थिवदेहाची पेटी स्मशानभूमीत तयार केलेल्या मंचावर ठेवण्यात आली. तेथे आमदार कांबळे, मुरकुटे, ससाणे, गुजर, दिघे, सरकारी अधिकार्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. (प्रतिनिधी)