सेमी हायस्पीड पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:22 IST2021-05-27T04:22:23+5:302021-05-27T04:22:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क घारगाव : गेल्या वर्षी मध्य रेल्वेची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर यावर्षी राज्य सरकारने मान्यता दिलेल्या देशातील पहिल्या ...

सेमी हायस्पीड पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
घारगाव : गेल्या वर्षी मध्य रेल्वेची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर यावर्षी राज्य सरकारने मान्यता दिलेल्या देशातील पहिल्या सेमी हायस्पीड ‘पुणे-नाशिक’ या रेल्वेमार्गासाठी संगमनेर तालुक्यातील पठार भागात जमीन मोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित असलेल्या या रेल्वेमार्गाने पूर्णत्वाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
महारेलचे उपमहाव्यवस्थापक सोमनाथ गुंजाळ, वरिष्ठ व्यवस्थापक मंगेश धोरण, सहायक व्यवस्थापक आर. एम. वाघ, स्थापत्य व्यवस्थापक नीलेश खांडगे, भूसंपादन अधिकारी सचिन काळे, महेंद्र गावडे, तलाठी के. बी. शिरोळे, कृषी सहायक पी. बी. मंडलिक आदी यावेळी उपस्थित होते. सोमवार (दि. २५) पासून प्रत्यक्ष जमीन मोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील नांदूर-खंदरमाळ या गावात पहिल्यांदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्रत्यक्ष आवश्यक जमिनींचे मोजमाप व त्यांचे मूल्य निश्चितीकरण झाल्यानंतर पुणे-नगर व नाशिक जिल्ह्यातील जमिनीची खरेदी सुरू होणार आहे.
या सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी राज्य शासनाने यापूर्वीच वित्तीय मान्यता दिली आहे. त्याद्वारे या प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होईपर्यंत अकरा वर्षांसाठी अतिरिक्त १० हजार कोटी रुपये देण्याची तयारी शासनाने दाखविली आहे. या प्रकल्पामुळे पुणे-नगर आणि नाशिक जिल्ह्यातील कृषी, औद्योगिक आणि पर्यटन उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे, तसेच ‘मुंबई-पुणे-नाशिक’ या सुवर्ण त्रिकोणाच्या विकासालादेखील गती येणार आहे. हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास आणण्यासाठी राज्य सरकारने घोषित केल्याप्रमाणे प्रकल्पात पन्नास टक्के समभाग देण्यात येणार आहेत.
जून २०१२ मध्ये राज्य सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. त्यावेळी या प्रकल्पाची एकूण किंमत १ हजार ८९९ कोटी ६४ लाख रुपये होती. यात राज्य सरकारच्या समभागाची रक्कम ९४९ कोटी ८२ लाख रुपये होती. मात्र, २०१७ पर्यंत या प्रकल्पाला चालना मिळाली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या रेल्वेमार्गाला अखेर राज्य शासनाने अर्थसंकल्पीय मंजुरीसह आर्थिक समभाग देण्यास मान्यता दिली. या प्रकल्पासाठी सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
२३५ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग, पुणे-अहमदनगर-नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे. दोनशे किलोमीटर प्रतितास वेग, पुढे हा वेग २५० किलोमीटरपर्यंत वाढवता येणार आहे. पुणे ते नाशिक हे अंतर अवघ्या पावणेदोन तासांत कापता येणार आहे. पुणे-नाशिकदरम्यान २४ स्थानके, १८ बोगदे, ४१ उड्डाणपूल व १२८ भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत. विद्युतीकरणासह एकाचवेळी दुहेरी मार्गाचे काम होणार आहे.