लग्न, सण आणि जत्रांवर सुतकांचा ‘लाॅक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:20 IST2021-05-19T04:20:43+5:302021-05-19T04:20:43+5:30
कोतूळ : गावगाड्याची नाळ असलेले सण, जत्रा आणि लग्न कोरोना टाळेबंदीबरोबर सुतकाने लाॅक केले आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक ...

लग्न, सण आणि जत्रांवर सुतकांचा ‘लाॅक’
कोतूळ : गावगाड्याची नाळ असलेले सण, जत्रा आणि लग्न कोरोना टाळेबंदीबरोबर सुतकाने लाॅक केले आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक खेड्यात गावाच्या वेशीवर श्रद्धांजलीच्या फलकांची दाटी झाल्याचे वास्तव आहे. भलेही जात-धर्म कोणताही असो टाळेबंदीबरोबर सुतकी लाॅक लागला हे वास्तव आहे.
काही गावात एक-दोन आडनावाचे लोक राहतात एकाच वेळी दोन बाजूला कुणाचं निधन झाले, तर संपूर्ण गावाला सुतक पडते. यात लग्न, धार्मिक विधी, सणही करत नाहीत. पोळ्याच्या सणाला सुतक असेल तर बैलांची मिरवणूकही होत नाही.
चैत्र, वैशाख (एप्रिल, मे ) महिन्यात गावखेड्यात चारदोन महिने आधी जमवलेली लग्न, होळी, पाडवा, अक्षय्य तृतीयेचे महत्त्वाचे सण येतात, तर प्रत्येक गावची यात्रा-जत्रा याच महिन्यात होते. गतवर्षी टाळेबंदीत पाचपंचवीस लोकांत लग्नही झाली. घरात बसून सणही झाले, गाजावाजा न करता गावातील ठरल्या तिथीला गावच्या कुलदैवताला व देवादिकांना यात्रा-जत्रांचे नैवेद्य व शेंदूर पाणीही झाले.
यंदा मात्र एप्रिल व मे महिन्यात अनेकांना कोरोनाच्या बाधेने, नैसर्गिक पद्धतीने तर काहींना दीर्घ आजाराने मरण आले. ग्रामीण भागात असे गाव अभावाने असेल जिथे कुणी गेला नाही. नवीन लग्न ठरलेल्या अनेक वधू-वरांच घरातल्या घरात शुभमंगल उरकण्याची तयारीही केली होती मात्र दोन्ही कडच्या भाविकतलं किंवा जवळच नातेवाईक या महामारीत गेलं आणि लग्न थांबले.
गुढीपाडव्याच्या व अक्षय्य तृतीयेच्या सणाला अनेक गावांत सूतक असल्याने साखरगाठ्या आणि कुंभार आळ्यावरचे घट असेच पडून आहेत. तर गावांतील देवदेवतांना जत्रे यात्रेचा नैवेद्य व शेंदूर-पाण्याला सुतकाचा लाॅक लागला आहे.