अकोलेतील दुर्गम आदिवासी भागात व्हेंटिलेटरचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:21 IST2021-05-07T04:21:10+5:302021-05-07T04:21:10+5:30
अकोले : दुर्गम आदिवासी तालुक्यात सरकारी दवाखान्यात एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नाही. मग तीव्र बाधित कोविड रुग्णांच्या गरजेचे व्हेंटिलेटर बेड ...

अकोलेतील दुर्गम आदिवासी भागात व्हेंटिलेटरचा अभाव
अकोले : दुर्गम आदिवासी तालुक्यात सरकारी दवाखान्यात एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नाही. मग तीव्र बाधित कोविड रुग्णांच्या गरजेचे व्हेंटिलेटर बेड कसे असणार? तसेच सिटीस्कॅन यंत्रणा नाही. सरकारी २४, खासगी ५० आणि शिक्षकांच्या योगदानातून सुरू झालेल्या कोविड सेंटरमधील ५० ऑक्सिजन बेडच्या तसेच तोकड्या आरोग्य कर्मचारी संख्या बळावर अकोलेकरांचा कोविड विरुद्धचा लढा सुरू आहे.
शिक्षकांनी नव्याने सुरू केलेले सुगाव कोविड केअर केंद्र दोनच दिवसात पूर्ण भरले. मंगळवारी सायंकाळी अकोलेतील एका पेशंटला व्हेंटिलेटर बेड गरज होती. पत्रकारांच्या मदतीने नाशिक येथे बेड मिळवून देण्यात आला आहे. तालुक्यात आतापर्यंत ७ हजार ७४२ कोरोना बाधित आढळून आले असून यापैकी ७ हजार १६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ८४ जण कोरोनावर मात करु शकले नाहीत. बरे होण्याचे प्रमाण ९२.५५ व मृत्यू १.०८ टक्के आहे. संसर्ग वेग १७.८४ इतका आहे. सध्या तालुक्यात ४७१ सक्रिय कोविड रूग्ण आहेत.
तालुक्यात चार ग्रामीण रूग्णालयात वर्ग एकचे तीन वैद्यकीय अधीक्षक पदे रिक्त आहेत. कोतूळ येथे २, देवठाण व खिरविरे प्रत्येकी १ असे १० प्राथमिक आरोग्य केंद्रात २० पैकी ४ वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत. खिरविरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. यशवंत खोकले व कोतूळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. लव्हाटे यांना कोरोनाने हिरावून नेले म्हणून येथील दोन पदे रिक्त झाली आहेत. काही आरोग्य कर्मचारी पदे रिक्त आहेत. अकोले येथील कोविड काळात सुरू झालेल्या एका खासगी रुग्णालयात ४ व्हेंटिलेटर व ६ सेमी व्हेंटिलेटर आहेत.
मुख्य डॉक्टर यांना कोरोना संसर्ग झाला होता ते यातून बरे झाले आहेत. या अडथळ्यामुळे काही दिवस सरकार यंत्रणेवर मोठा ताण आला होता. जोखमीचे रूग्ण त्यांच्या सोईनुसार अन्य ठिकाणी दाखल झाला आहेत, असे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सांगितले.
.................
खानापूर सरकारी कोविड सेंटरचे ऑक्सिजन बेड रुग्ण सुगाव येथे हलविण्यात आले आहे. समशेरपूर येथे सरकारी १० ऑक्सिजन बेड असून राजूर- कोतूळ ग्रामीण रूग्णालय येथे प्रत्येकी २० आणि अकोले ग्रामीण रूग्णालयात ४० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर लवकर सुरू करणार आहे. उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
- डाॅ. किरण लहामटे, आमदार
..........
बाधितांचा आकडा घटला
तालुक्यात दोन चार दिवसांपूर्वी सक्रिय रुग्णांची संख्या ६५० च्या दरम्यान होती. बुधवारी ही संख्या ४७२ झाली असून बाधितांचा आकडा दोन दिवसात थोडा घटला आहे. गावोगावी प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी यांच्या माध्यमातून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ आरोग्य सर्व्हे पूर्ण झाला आहे.