कोपरगावात ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:20 IST2021-04-16T04:20:12+5:302021-04-16T04:20:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : शहरासह तालुक्यात गेल्या महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वच कोविड ...

कोपरगावात ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा !
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : शहरासह तालुक्यात गेल्या महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वच कोविड हेल्थ सेंटरसह खासगी रुग्णवाहिकांची मागणी वाढली आहे. परंतु, मागणी करूनही पुरवठा होत नसल्याने कोपरगावात ऑक्सिजन सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
कोपरगावात एक हजारपेक्षा जास्त रुग्ण बाधित आहेत. यातील लक्षणे नसलेल्या काही रुग्णांवर घरीच उपचार सुरु आहेत. ज्यांना लक्षणे आहेत; परंतु प्रकृती स्थिर असून, गोळ्या घेऊन बरे होतील, अशांवर कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरु आहेत. मात्र, ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यांना ऑक्सिजनची गरज आहे, अशा रुग्णांवर सरकारी कोविड हेल्थ सेंटर व शहरातील खासगी कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.
यातील अनेक रुग्णांची ऑक्सिजनची पातळी खालावल्याने त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासत असून, त्याची मागणीदेखील वाढली आहे. सरकारी कोविड हेल्थ सेंटरमध्ये नगर येथून रोजच्या रोज गरजेइतक्या सिलिंडरचा पुरवठा होतो. मात्र, खासगी कोविड सेंटरला अपेक्षित पुरवठा होत नसल्याने तो मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
तसेच प्रकृती खालावलेल्या रुग्णांना कोपरगावात बेड न मिळाल्याने पुढील उपचारासाठी नगर, नाशिक, संगमनेर येथे खासगी रुग्णवाहिकेतून न्यावे लागत आहे. या प्रवासादरम्यान अशा रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. परंतु, गेल्या दोन तीन दिवसात खासगी रुग्णवाहिकांना ऑक्सिजन सिलिंडरच मिळत नसल्याने रुग्णवाहिका चालकांसह रुग्णांसाठी मोठे गैरसोयीचे ठरत आहे.
............
अशी आहे ऑक्सिजन सिलिंडरची रोजची मागणी ...
* सरकारी कोविड हेल्थ सेंटर - ३० ते ४० सिलिंडर
* खासगी कोविड हेल्थ सेंटर - २०० ते २५० सिलिंडर
........
असे आहेत ऑक्सिजन बेड ..
* सरकारी कोविड हेल्थ सेंटर - २४
* खासगी कोविड हेल्थ सेंटर - १२४
..........
प्रकृती गंभीर झालेल्या रुग्णांना खासगी रुग्णवाहिकेतून नगर, नाशिक, संगमनेर येथे घेऊन जावे लागते. प्रसंगी कोणत्याही ठिकाणी पोहोचेपर्यंत एका रुग्णाला ऑक्सिजनचा एक छोटा सिलिंडर लागून जातो. गेल्या काही दिवसात रोजच असे रुग्ण येत आहेत. परंतु, गेल्या दोन दिवसात रुग्णवाहिकेसाठी असणारे सिलिंडर कोपरगावसह इतरही कोठेच मिळत नसल्याने गैरसोय होते आहे.
- अमित खोकले, खासगी रुग्णवाहिका चालक - मालक, कोपरगाव
............
चार दिवसांपासून ऑक्सिजन सिलिंडर भरून आणण्यासाठी प्लांटवर चार गाड्या उभ्या आहेत. सर्वत्र सिलिंडरची प्रचंड मागणी वाढल्याने गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे अद्याप एकही गाडी सिलिंडर घेऊन आलेली नाही.
- रवींद्र ठोळे, ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादार, कोपरगाव
..........
कोरोनामुळे खासगी कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वाढली आहे. परंतु, प्लांटवर वारंवार मागणी करूनही पाहिजे तेवढा पुरवठा होत नाही. त्यामुळे कोविड सेंटरची मागणी पूर्ण करताना खूप धावपळ होत आहे.
- रिकब शिंगी, ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादार, कोपरगाव
...........
कोपरगावात ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न करून पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बुधवारी रात्री खासगी कोविड हेल्थ सेंटरला प्रशासनाच्या मदतीने सिलिंडर उपलब्ध करून दिले. त्यामुळे परिस्थिती स्थिर आहे.
- प्रशांत सरोदे, सहायक घटना व्यवस्थापक, कोपरगाव