क्रांतिज्योतीची ‘काव्यफुले’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:22 IST2021-01-03T04:22:27+5:302021-01-03T04:22:27+5:30
हृदय भरून येते, वाटते हे कशाला उपकर कृती आहे, भार होई मनाला सुजन हितकारांना अर्पिते ही सुमाला...!! आज ३ ...

क्रांतिज्योतीची ‘काव्यफुले’
हृदय भरून येते, वाटते हे कशाला
उपकर कृती आहे, भार होई मनाला
सुजन हितकारांना अर्पिते ही सुमाला...!!
आज ३ जानेवारी ‘बालिका दिन’ अर्थात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. सावित्रीबाई म्हटलं की, क्रांतिज्योती आद्यशिक्षिका, मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या थोर समाजसेविका, अशी त्यांची ओळख आहे. काही अंशी महात्मा जोतिबा फुलेंच्या कामाच्या माध्यमातून त्यांनी केलेलं सामाजिक कार्य किंवा प्लेगच्या काळातील रुग्णसेवा हेही आपल्याला माहीत आहे. मात्र, सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा पैलू उलगडण्याचा हा प्रयत्न या लेखातून केला आहे.
..........
स्त्रीशिक्षण, रुग्णसेवा, सामाजिक कार्यामध्ये त्यांच्या काव्यप्रतिभेकडं साऱ्यांचाच कानाडोळा झाला असावा. काव्यनिर्मितीमागची प्रेरणा आणि प्रोत्साहन कोणाचं होतं हे आपल्याला ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ या रचनेतून लक्षात येतं. काव्यरचनेची प्रेरणा आणि श्रेय जोतिबा असल्याचे यात त्या नमूद करतात...
जयाचे मुळे मी कविता रचिते ।
जयाचे कृपे ब्रह्म आनंद चित्ते ।।
जयाने दिली बुद्धीही सावित्रीला ।
प्रणाम करी मी यती जोतिबाला ।।
सावित्रीबाई या जोतिबांच्या अंधभक्त नव्हेत, तर डोळस अनुयायी होत्या. आपले पती काय काम करत आहेत आणि ते किती पुरोगामी विचारांचे आहेत याची जाण त्यांना होती. समकालीन आपल्या ज्ञानसूर्याच्या कार्यानं प्रेरित झालेल्या सवित्रीबाईंना इतिहासाची जाण होती. इतिहासातील आपला स्वाभिमान अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचंसुद्धा विस्मरण न होता ते आपल्याला प्रातःस्मरणीय असल्याचं सांगतात...
छत्रपती शिवाजीचे । प्रातःस्मरण करावे
शूद्रादि अति शूद्रांचा । प्रभू वंदू मनोभावे
नळराज युधिष्ठिर । द्रौपदी ही जनार्दन
पुण्यश्लोक पुराणात । इतिहासी शिवानंन ।
छत्रपती शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाबरोबरच महाराणी छत्रपती ताराबाई यांच्या पराक्रमाची महतीसुद्धा सवित्रीबाईंना ज्ञात होती.
‘छत्रपती सिंहासनीची एक राणी ताराबाई,
कोल्हापूरची जगदंबा महाराष्ट्राची अंबाई
शत्रूवर घाली छापा,
काळ तयाची ती होई,
जेरीस शत्रूला करून,
करी बेफाम चढाई,
न्हाऊन टाकी रणभूमी शत्रू रक्तानी सारी,
चपलता विजेची जैसी तशीच कडाडे संहारी.’
तेजस्वी इतिहासाची कल्पना असणाऱ्या आणि जोतिबांबरोबर धगधगणारा वर्तमान जगात असताना दीनदलित, दुःखितांची खरी समस्या ही अज्ञान आहे हे सावित्रीबाईंनी जाणले होते. ज्ञानदानाचा वसा त्यांनी अतिशय सुज्ञपणे घेतला होता. हे अज्ञान दूर करण्यासाठी विद्येची आराधना करून विद्या मिळवणे याशिवाय तरणोपाय नाही हेही या क्रांतिज्योतीला माहीत होते आणि म्हणून त्या सांगतात...
‘अभ्यास करी विद्येचा । विद्येस देव मानून
घे नेटाने तिचा लाभ । मनी एकाग्र होऊन
विद्या हे धन आहे रे । श्रेष्ठ साऱ्या धनाहून
तिचा साठा जयापाशी । ज्ञानी तो मानती जन’
आपला आणि इथल्या बहुजन जनतेचा उद्धार करण्याची ताकद फक्त शिक्षणात आहे, हे सावित्रीबाई चांगल्या प्रकारे जाणून होत्या आणि म्हणून ही विद्या घेण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी आता मागंपुढं पाहू नका, असं सांगताना सावित्रीबाई म्हणतात...
‘विद्येविन गेले । वाया गेले पशु
स्वस्थ नका बसू । विद्या घेणे
शूद्र अतिशूद्र । दुःख निवाराया
इंग्रजी शिकाया । संधी आली’
इतिहास, सामाजिक परिस्थितीच नव्हे, तर माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकानं कसं वागलं-जगलं पाहिजे, हे आपल्या ‘सुज्ञ मानवाची लक्षणे’ या काव्यातून त्या सांगतात...
‘तयास मानव म्हणावे का ?
ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेचि गोडी नाही
बुद्धी असुनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का’
मानवाची क्रांतिकारी व्याख्या सांगणाऱ्या सवित्रीबाईंनी जगत्गुरू तुकोबारायांच्या ‘नवसे कन्या पुत्र होती, का करणे लागे पती’ या अभंगाच्या तोडीस तोड अभंग लिहिला. त्या म्हणतात...
‘धोंडे मुले देती । नवसापावती
लग्न का करती । नर नारी
सावित्री वदते । करुनि विचार
जीवन साकार । करुनि घ्या ।।’
यासह इतर कवितांबरोबर सवित्रीबाईंनी बोलक्या बाहुल्या, पिवळा चाफा आणि जाईचे फूल, अशा काही कवितांचीसुद्धा रचना करून संदेश दिला. मराठी साहित्यामध्ये नवकवितांचे पर्व सुरू करणाऱ्या, त्याला तात्कालिक परिस्थितीमध्ये एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या सावित्रीबाई मराठी साहित्यातील अनमोल रत्न आहेत.
-नारायण चंद्रकांत मंगलारम
(लेखक राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक आहेत.)