कोतकर पुत्रांचा जामीन अर्ज फेटाळला
By Admin | Updated: September 28, 2016 00:36 IST2016-09-28T00:04:54+5:302016-09-28T00:36:27+5:30
अहमदनगर : शेवगाव येथील लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या माजी महापौर संदीप कोतकरसह सचिन व अमोल कोतकर

कोतकर पुत्रांचा जामीन अर्ज फेटाळला
अहमदनगर : शेवगाव येथील लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या माजी महापौर संदीप कोतकरसह सचिन व अमोल कोतकर यांचा मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला़ जामीन न मिळाल्याने कोतकर बंधुंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे़
अशोक लांडे याचा १९ मे २००८ रोजी मारहाणीत मृत्यू झाला होता़ यावेळी हा अपघाती मृत्यू असल्याचे दाखविण्यात आले होते़ जिल्हा रुग्णालयातून तसे वैद्यकीय प्रमाणपत्रही मिळविले होते़ या प्रकरणी मात्र फिर्यादी शंकर विठ्ठल राऊत यांनी न्यायालयात दाखल केलेल्या खासगी तक्रारीमुळे या खून प्रकरणाला वाचा फुटली होती. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानुसार, तपास करून पोलिसांनी भानुदास कोतकर यांच्यासह त्यांची तीन मुले, संदीप, सचिन व अमोल यांच्यासह १५ जणांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपाधीक्षक ज्योतीप्रियासिंग यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी भानुदास कोतकरसह त्याच्या तीन मुलांना अटक केली होती़ न्यायालयाने कोतकर पुत्रांना जामीन मंजूर केला होता़ पुढे या खटल्याची सुनावणी नाशिक येथील जिल्हा सत्र न्यायालयात झाली़ न्यायालयाने ११ एप्रिल २०१६ रोजी भानुदास कोतकरसह संदीप, सचिन, अमोल यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ कोतकर पुत्रांनी जामीन मिळावा, यासासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता़ सोमवारी न्यायालयात न्यायमूर्ती अभय ओक व एस़आऱ सय्यद याच्या पिठाससमोर सुनावनी झाली़ यावेळी न्यायालयाने तिघांचेही जामीन अर्ज फेटाळून लावले़ सरकारी पक्षातर्फे अॅड़ म्हात्रे यांनी बाजू मांडली तर राऊत यांच्यावतीने अॅड़ अनिलकुमार पाटील यांनी काम पाहिले़
(प्रतिनिधी)