कोरठण मंदिर यात्राकाळात दर्शनासाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:21 IST2021-01-23T04:21:51+5:302021-01-23T04:21:51+5:30

पारनेर : राज्यातील भाविकांचे कुलदैवत असलेल्या पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचा वार्षिक यात्राैत्सव पौष ...

Korthan temple closed for darshan during pilgrimage | कोरठण मंदिर यात्राकाळात दर्शनासाठी बंद

कोरठण मंदिर यात्राकाळात दर्शनासाठी बंद

पारनेर : राज्यातील भाविकांचे कुलदैवत असलेल्या पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचा वार्षिक यात्राैत्सव पौष पौर्णिमेला २८ ते ३० जानेवारी दरम्यान येत आहे. या काळात भाविकांसाठी दर्शन व्यवस्था बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासन देवस्थान समिती व मानकऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान, यात्रा उत्सवाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून मानाच्या काठ्या व पालख्या प्रतिकात्मकरित्या मर्यादित स्वरूपात मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत प्रशासकीय नियम पाळून खंडोबा दर्शनासाठी येतील, असे यावेळी सांगण्यात आले.

याप्रसंगी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, देवस्थानचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, भालचंद्र दिवटे, मोहन रोकडे यांच्यासह अधिकारी, मानकरी उपस्थित होते.

मानाच्या काठी व पालखी सोबत प्रत्येकी दहा भाविकांना परवानगी दिली जाणार असून या भाविकांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून परवाने दिले जातील. तसेच या भाविकांकडे वैद्यकीय तपासणीचे दाखले आवश्यक असल्याचे निरीक्षक बळप यांनी सांगितले. मानाच्या बेल्हे व ब्राह्मणवाडा येथील काठ्या शासकीय पूजेनंतर एकाच वेळी कळस व देवदर्शन घेतील, असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी स्पष्ट केले. तसेच सर्वच मानाच्या काठ्यांची उंची २१ फूट राहिल, असे यावेळी ठरविण्यात आले. यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष किसन धुमाळ यांनी आभार मानले. यात्रा काळात कोरठण गडावर येणारे सर्व रस्ते दोन किमी. अंतरावर अडविण्यात येतील. त्यामुळे या काळात भाविकांनी येऊ नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

Web Title: Korthan temple closed for darshan during pilgrimage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.