कोराेनाच्या ‘ब्रेक द चेन’चे शेतकऱ्यांवर नवे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:21 IST2021-04-08T04:21:44+5:302021-04-08T04:21:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शेवगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने नियम अधिक कडक करताना ‘ब्रेक द चेन’च्या नावाखाली ...

कोराेनाच्या ‘ब्रेक द चेन’चे शेतकऱ्यांवर नवे संकट
लोकमत न्यूज नेटवर्क
शेवगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने नियम अधिक कडक करताना ‘ब्रेक द चेन’च्या नावाखाली अत्यावश्यक सेवाची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याच आठवडे बाजार बंद झाल्याने शेतकऱ्यांपुढे भाजीपाला विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यापारी कमी दराने मागणी करत असल्याने ग्रामीण भागातील अर्थकारण संकटात सापडले आहे.
गत वर्षीपासून कोरोनाचे संकट सुरू झाले आहे. मध्यंतरीच्या कालावधीत कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता. मात्र, आता गत महिन्यापासून पुन्हा संसर्ग वाढू लागला आहे. कोरोनाने ग्रामीण भागाला विळखा घातला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियम अधिक कडक केले आहेत. सध्या हॉटेल व्यवसायावर ग्राहकांच्या उपस्थिती संदर्भात निर्बंध लावण्यात आले आहे. त्यामुळे खवय्यांची हॉटेलमध्ये होणारी गर्दी कमी झाली आहे. त्याचबरोबर आठवडी बाजारही बंद करण्यात आले आहेत.
शेवगावसह ग्रामीण भागातील, छोटे-मोठे व्यावसायिक, शेतकरी, भाजीपाला उत्पादक हे आठवडे बाजारात भाजीपाल्याची तसेच अन्य साहित्याची खरेदी-विक्री करीत असतात. मात्र, आठवडी बाजार बंद पडल्याने हे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.
ग्रामीण भागातील असंघटित क्षेत्रातील कामगार शहरात येऊन अथवा बांधकामावर मजुरी करतात. त्यावर त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह असतो. मात्र, आता हाताला काम नसल्याने मजुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांसह मजूरही संकटात सापडले आहेत.
---
आठवडे बाजार बंद झाल्याने अर्धा एकर कोथिंबीर शेतात सुकून गेल्याने ६० ते ७० हजाराचे नुकसान झाले. भाजी मंडईत विक्री करून पाहिली. मात्र पहिल्यासारखे ग्राहक खरेदीसाठी येत नाहीत. त्यात कोरोनाची भीती आहे. सध्याच्या परिस्थितीत माझ्यासारख्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे.
-मच्छिंद्र डाके,
शेतकरी
--
आठवडे बाजार बंद झाले तसे व्यापारी भाजीपाला कमी दरात मागणी करीत आहेत. सरासरी भावापेक्षा अर्ध्याहून कमी दराने भाव पाडून मालाची मागणी करीत असल्याने उत्पादन खर्च निघेना झाला आहे. ग्राहकांची संख्या मंदावली असून कोरोना होण्याच्या भीतीने ग्राहक बाजारात येण्यास टाळाटाळ करीत आहेत. हंगामी पिके घेत असताना दैनंदिन गुजराण होण्यासाठी भाजीपालासारखे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत असतात. आठवडे बाजार बंद झाल्याने ग्रामीण अर्थकारणाला खीळ बसली आहे.
-बाळासाहेब फटांगडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
--
०७ शेवगाव१
आठवडे बाजार बंद झाल्याने मालाची मागणी घटली असून परिणामी शेवगाव येथील शेतकरी मच्छिंद्र डाके यांच्या शेतातील कोथिंबीरची अशी अवस्था झाली आहे.