कोपर्डी बलात्कार-खून खटल्यातील मारेक-यांना फाशी की जन्मठेप? बुधवारी फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 20:39 IST2017-11-28T20:36:10+5:302017-11-28T20:39:19+5:30
राज्यभर गाजलेल्या कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याचा बुधवारी जिल्हा न्यायालयात निकाल लागणार असून, निर्भयाच्या मारेक-यांना जन्मठेप मिळते की फाशीची शिक्षा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोपर्डी बलात्कार-खून खटल्यातील मारेक-यांना फाशी की जन्मठेप? बुधवारी फैसला
अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याचा बुधवारी जिल्हा न्यायालयात निकाल लागणार असून, निर्भयाच्या मारेक-यांना जन्मठेप मिळते की फाशीची शिक्षा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निकालानंतर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हा न्यायालयासह, नगर शहर, कोपर्डीत मोठा बंदोबस्त तैनात राहणार आहे. कोपर्डी खटल्यातील मुख्य आरोपी पप्पू उर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे, (वय २५), संतोष गोरख भवाळ (वय ३०) व नितीन गोपीनाथ भैलुमे (वय २६) यांच्यावर १८ नोव्हेंबर रोजी न्यायालयात (कलम ३७६), खून करणे (३०२) व छेडछाड करणे (कलम ३५४) तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम ६, ८ व १६ प्रमाणे दोष सिद्ध झाला आहे. या कलमातंर्गत फाशी अथवा जन्मठेपेच्याच शिक्षेची तरतूद आहे. या खटल्यातील सर्व न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्याने आता केवळ निकाल देणे बाकी आहे. बुधवारी दुपारी बारापर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. हा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात होणारी गर्दी लक्षात घेत पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. बाहेरील उपस्थितांना निकाल ऐकता यावा, यासाठी ध्वनीक्षेपकाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
कोपर्डी येथील नववीत शिकणारी निर्भया (नाव बदललेले आहे) गतवर्षी १३ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भाजीचा मसाला आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. रस्त्याने जात असताना वाटेत तिची सायकल अडवून रस्त्याच्या कडेला तिच्यावर अत्याचार करण्यात आला. अत्याचारानंतर तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता.