तुलसी रामायण कथेत खराखुरा शुभमंगल सोहळा : धोत्रे येथे एक गाव एक गणपती उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 18:45 IST2018-09-22T18:44:52+5:302018-09-22T18:45:07+5:30
तालुक्यातील पूर्व भागातील धोत्रे गावातील विरभद्र गणेश मित्र मंडळाच्या वतीने गेल्या २४ वर्षापासून अखंडित एक गाव एक गणपतीची परंपरा सुरु ठेवली आहे.

तुलसी रामायण कथेत खराखुरा शुभमंगल सोहळा : धोत्रे येथे एक गाव एक गणपती उपक्रम
रोहित टेके
कोपरगाव : तालुक्यातील पूर्व भागातील धोत्रे गावातील विरभद्र गणेश मित्र मंडळाच्या वतीने गेल्या २४ वर्षापासून अखंडित एक गाव एक गणपतीची परंपरा सुरु ठेवली आहे. यंदाही दहा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करून गणेशाची स्थापना केली आहे. मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या तुलसी रामायण कथा सोहळ्यात मंडळातीलच एका सदस्याचा खरा-खुरा विवाह सोहळा पार पडला.
धोत्रे येथे दरवर्षी एक वेगळा संदेश दिला जातो. यंदाही तुलसी रामायण कथा सोहळा आयोजित केली होता. या कथेमध्ये शेतकरी कुटुंबातील व मंडळातील उच्चशिक्षित सदस्य योगेश बोजगे व माधुरी चव्हाण यांचा दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने कथेदरम्यान शुक्रवारी रात्री ९ वाजता प्रत्यक्षात प्रभू श्रीरामचंद्र व माता-सीता यांच्या वेशभूषेत हा विवाह सोहळा पार पडला. या उपक्रमात सर्व गावचा सहभाग होता. अशा प्रकारे लग्न सोहळे पार पडले तर नक्कीच राज्यातील शेतकरी आत्महत्या कमी होतील, असा मंडळातील सर्व सदस्यांनी व्यक्त केला.
दरम्यान आमदार स्नेहलता कोल्हे यांनी नवदांपत्यास कन्यादान केले. लग्नसमारंभप्रसंगी शुभेच्छा दिल्या. विवाह सोहळा यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्वच सदस्यांनी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. या सोहळ्यासाठी संत महंत, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
सामुदायिक विवाह सोहळ्याचा मानस
मंडळाच्या माध्यमातून धोत्रे गावात वर्षभर अनेक उपक्रम राबविले जातात. गावातील गोरगरिबांच्या लग्नात व धार्मिक कार्यात सक्रीय सहभाग मंडळाच्या सदस्याचा असतो. येत्या उन्हाळ्यात या मंडळातील सर्व सदस्याचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा करण्याचा मानस आहे.