खंदरमाळ-येठेवाडी रस्त्याचा ‘खड्डाखेळ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:21 IST2021-04-09T04:21:37+5:302021-04-09T04:21:37+5:30
संगमनेरातील ठेकेदार महेश सुरेश जाजू यांनी खंदरमाळ ते येठेवाडी या रस्त्याच्या दुरुस्ती व देखभालीच्या कामाची निविदा भरली होती. निविदेत ...

खंदरमाळ-येठेवाडी रस्त्याचा ‘खड्डाखेळ’
संगमनेरातील ठेकेदार महेश सुरेश जाजू यांनी खंदरमाळ ते येठेवाडी या रस्त्याच्या दुरुस्ती व देखभालीच्या कामाची निविदा भरली होती. निविदेत नमूद केलेला अंदाजपत्रकीय दर २५ लाख ७४ हजार ७८१ इतका होता. या दरापेक्षा १८ टक्के कमी दराने त्यांनी हे काम २१ लाख ११ हजार ३२० रुपयांना घेतले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे संगमनेरचे कार्यकारी अभियंता यांनी जाजू यांना १८ सप्टेंबर २०१९ला कार्यारंभ आदेश दिला होता. हे काम पूर्ण करण्यासाठी पावसाळ्यासह २४ महिन्यांची मुदत देण्यात आली होती.
पाच महिन्यांनी १८ सप्टेंबर २०२१ला या कामाची मुदत संपणार आहे. मात्र, अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. रस्त्यात अनेक ठिकाणी मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. दोन महिन्यांनी पावसाळा सुरू होणार आहे. त्यावेळी खड्डे बुजविण्याचे काम शक्य नाही. पावसाळ्यात येठेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची अधिकच दुरवस्था होते. रस्ता खराब असल्याने शेतातील काढलेला माल शेतकऱ्यांना बाजारात नेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. केवळ खड्डे न बुजविता डांबरीकरण करून चांगला रस्ता तयार करावा, जेणे करून कायमची अडचण दूर होईल, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
-------------
दोन महिन्यांपूर्वी या रस्त्याचे एकाच दिवसात खड्डे बुजविण्यात आले. हे खड्डे योग्य पद्धतीने बुजवलेले दिसत नाहीत. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजिनक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करून ठेकेदाराला योग्य पद्धतीने खड्डे बुजविण्यास सांगावे.
- गणेश लेंडे, सामाजिक कार्यकर्ते, खंदरमाळवाडी, ता. संगमनेर
-----------
खंदरमाळवाडी ते येठेवाडी रस्त्यावर बाडगीचा ओढ्यावरील सिमेंटच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. ठिकठिकाणी रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
रामनाथ कजबे, ग्रामस्थ, खंदरमाळवाडी, ता. संगमनेर
-----------
खंदरमाळवाडी ते येठेवाडीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे भरले आहेत. वाहतुकीचा रस्ता सुस्थितीत रहावा, यासाठी खड्डे भरण्याचे टेंडर काढले होते. यात डांबरीकरणाचे कुठलेही काम नसून केवळ खड्डे भरण्याचे काम होते. हे काम साधारण १६०० मीटरचे असून, ते २१ लाख ११ हजार ३२० रुपयांचे आहे. खड्डे भरण्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला यातील काही रक्कम अदा करण्यात आली आहे.
- जे.कडाळे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोले - २