डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांना विलगीकरणात ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:21 IST2021-04-24T04:21:11+5:302021-04-24T04:21:11+5:30
अहमदनगर : हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतलेले कोराेनाबाबतचे रुग्ण घरी सोडले जातात; मात्र घरी गेल्यानंतर अनेकांकडे विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था नसते. त्यामुळे ...

डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांना विलगीकरणात ठेवा
अहमदनगर : हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतलेले कोराेनाबाबतचे रुग्ण घरी सोडले जातात; मात्र घरी गेल्यानंतर अनेकांकडे विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था नसते. त्यामुळे ते रुग्ण कुटुंबात व समाजात वावरतात. त्यामुळे इतर व्यक्तींना मोठ्या प्रमाणात संसर्ग होतो. त्यामुळे डिस्चार्ज दिलेले रुग्ण घरी न सोडता १४ दिवसांपर्यंत विलगीकरण कक्षात ठेवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आदर्शगाव हिवरे बाजारचे उपसरपंच पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पवार म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शहराबरोबर ग्रामीण भागात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग सुरू आहे. त्याचा प्रचंड ताण आरोग्य यंत्रणेवर आहे. तरी त्यासाठी स्वतंत्र नियमावली करून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिलेल्या कोरोनाबाबतच्या रुग्णाला घरी न सोडता १४ दिवसांपर्यंत विलगीकरण कक्षात ठेवण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. त्यासाठी ज्या ठिकाणी स्वच्छतागृह, पाणी व राहण्याची चांगली व्यवस्था असेल असे मंगल कार्यालय, शाळा, कॉलेज ताब्यात घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
डिस्चार्ज मिळालेला रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होतो की नाही याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा. एखादा रुग्ण नजर चुकवून विलगीकरण कक्षात न जाता घरी गेल्यास पोलीस यंत्रणेला कळवून त्याच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी. विलगीकरण कक्षात रुग्णाला वेळेवर गोळ्या, जेवण एवढीच व्यवस्था करण्याची गरज आहे. एखादा रुग्ण अत्यवस्थ असल्यास त्याला पुन्हा हॉस्पिटलपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी विलगीकरण कक्षाची राहील, अशा काही उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पवार यांनी निवेदनात केली आहे.