केदारेश्वरने केले ४ लाख मेट्रिक टन गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:21 IST2021-04-21T04:21:41+5:302021-04-21T04:21:41+5:30
बोधेगाव : केदारेश्वर साखर कारखान्याचे चालू गळीत हंगामात ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. नैसर्गिक आपत्ती ...

केदारेश्वरने केले ४ लाख मेट्रिक टन गाळप
बोधेगाव : केदारेश्वर साखर कारखान्याचे चालू गळीत हंगामात ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणींवर मात करून कारखान्याने गेल्या १५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अवघ्या १७२ दिवसांत हे उद्दिष्ट गाठले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे यांनी दिली.
बोधेगाव (ता. शेवगाव) येथील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने यंदा कार्यक्षेत्रात मुबलक प्रमाणात ऊस असल्याने ४ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले होते. कारखान्याचे संस्थापक माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकरी, सभासद ते कारखाना प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आदींनी अहोरात्र मेहनत घेऊन व्यवस्थापनास सहकार्य केल्याने मंगळवारी (दि.२०) सकाळी हे उद्दिष्ट पूर्ण झाले, असे ढाकणे म्हणाले.
यंदा ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपातून ३ लाख ५३ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून साखर उतारा सरासरी ९.२५ इतका राहिला आहे. पुढील हंगामासाठी ५ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याचे ढाकणे यांनी सांगितले.
................
५२५ कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस
केदारेश्वर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. यामुळे संचालक मंडळाकडून कारखान्यातील ५२५ कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे. तशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे यांनी केली.
फोटो- ॲड. प्रताप ढाकणे