कर्जतचा बंधारा फुटला
By Admin | Updated: October 7, 2016 01:25 IST2016-10-07T00:34:04+5:302016-10-07T01:25:41+5:30
कर्जत : पावसाळ्याच्या तोंडावर घाई गडबडीत बांधकाम उरकलेला कर्जतच्या शारदा नगरी वसाहतीजवळील जलसंधारण विभागाचा बंधारा पहिल्याच धुवाँधार पावसाळयात वाहून गेला.

कर्जतचा बंधारा फुटला
कर्जत : पावसाळ्याच्या तोंडावर घाई गडबडीत बांधकाम उरकलेला कर्जतच्या शारदा नगरी वसाहतीजवळील जलसंधारण विभागाचा बंधारा पहिल्याच धुवाँधार पावसाळयात वाहून गेला. त्यामुळे बंधाऱ्यातील लाखो लिटर पाण्यासोबतच जमीनही वाहून गेली. जलसंधारण मंत्र्यांच्या मतदारसंघातच हा प्रकार घडल्याने जलसंधारण विभागाच्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या बंधाऱ्याचे काम एका नगरसेविकेच्या पतीने केल्याचे सांगितले जाते. या बंधाऱ्याच्या दर्जाहिन कामाबाबत अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे कर्जत येथे जलसंधारणची अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार योजनेमधून शारदा नगरी येथील बंधारा मंजूर करण्यात आला होता. या कामासाठी २३ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी १५ लाख रुपये ठेकेदारास अदा करण्यात आले आहे. हे काम एका नगरसेविकेच्या पतीने पूर्ण केले. त्यासाठी ३० जूनपर्यंत पूर्ण करण्यास मुदत दिली होती. मात्र हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. पावसाळ्याच्या तोंडावर हे काम गडबडीत पूर्ण करण्यात आले. हे काम पदाधिकाऱ्यांचे असल्यामुळे या कामावर नियंत्रण असणाऱ्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. तसेच घाईघाईत उरकल्यामुळे हे काम गुणवत्तापूर्ण होऊ शकले नाही. यामुळे पहिल्याच पावसाळ्यात हा बंधारा फुटला. दोन्ही बाजूंनी जमीन वाहून गेल्याने बंधाऱ्यामध्ये साठलेले सर्व पाणी वाहून गेले. पहिल्याच पावसाळ्यात बंधारा वाहून गेल्याने जलसंधारणमंत्र्यांच्या मतदारसंघातील जलसंधारण खात्याच्या कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येथील वाहून जाणारे पाणी न अडविल्याने शारदा नगरी भागासाठी लवकरच पाण्याचे टँकर सुरू करावे लागण्याची शक्यता आहे.
(तालुका प्रतिनिधी)