कर्जतकरांनी साजरे केले श्रमदानाचे त्रिशतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:22 IST2021-07-29T04:22:28+5:302021-07-29T04:22:28+5:30
स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा भाग एक व आता माझी वसुंधरा भाग दुसरा या स्पर्धेत कर्जत नगरपंचायतीने सहभाग घेतला आहे. ...

कर्जतकरांनी साजरे केले श्रमदानाचे त्रिशतक
स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा भाग एक व आता माझी वसुंधरा भाग दुसरा या स्पर्धेत कर्जत नगरपंचायतीने सहभाग घेतला आहे. सामाजिक संघटना आणि नगरपंचायतीच्या वतीने शहर स्वच्छतेची सुरुवात केली. त्या लावलेल्या रोपट्याचे विशाल कल्पवृक्षात रूपांतर होत स्वच्छतेची लोकचळवळ उभी राहिली. त्या चळवळीचा आज तीनशेवा दिवस असून तीनशे झाडे लावून कर्जतकरांनी श्रमदानाचे त्रिशतक केले आहे.
कर्जत शहरातील विविध सामाजिक संघटनांनी सुरू केलेल्या लोकसहभागातून श्रमदान चळवळीला तीनशे दिवस पूर्ण झाले. हा तृतीय शतकोत्तर दिन मोठ्या दिमाखात श्रमदान करून प्रभातनगरमध्ये संपन्न झाला. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह सर्व सामाजिक संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिनाची आठवण म्हणून तीनशे वृक्षांची लागवड करण्यात आली. गेल्या वर्षी २ ऑक्टोबर २०२० रोजी ही चळवळ शहरात सुरू झाली होती. बुधवारी शहरातील प्रभातनगर येथे या समाजविधायक लोकचळवळीच्या ३०० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेगवेगळ्या औषधी, फळ, फुले अशा तीनशे झाडांची रोपे लावण्यात आली.
माझी वसुंधरा स्पर्धेत येथील नगरपंचायतने २०२०-२१ मध्ये महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. आगामी २०२१-२२ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविला, असा विश्वास मुख्याधिकाऱ्यांनी व्यक्त केला. प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन अशोक नेवसे यांनी केले, तर आभार प्रा. विशाल मेहेत्रे यांनी मानले.
----------
फोटो - २८कर्जत वृक्षारोपण
कर्जत येथील प्रभातनगर येथे लोकसहभागातून श्रमदान अभियानाचा तीनशेवा दिवस साजरा केला. यावेळी वृक्षारोपण करताना नागरिक.