कर्जत -जामखेड होणार ऑक्सिजन हब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:19 IST2021-05-15T04:19:37+5:302021-05-15T04:19:37+5:30
जामखेड : मतदारसंघातील रूग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून जामखेड तालुक्यात डॉ. आरोळे ...

कर्जत -जामखेड होणार ऑक्सिजन हब
जामखेड : मतदारसंघातील रूग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून जामखेड तालुक्यात डॉ. आरोळे कोविड सेंटर येथे तर कर्जत येथील उपजिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यास जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. याद्वारे जामखेडमध्ये ६५० एलपीएम ऑक्सिजन निर्मिती होणार असून या प्रकल्पातून १२५ ऑक्सिजन सिलिंडर प्रति दिवशी भरले जाणार आहेत. कर्जत येथे १२५० एलपीएम ऑक्सिजन निर्मिती होऊन २५० सिलिंडर प्रतिदिन तयार होतील.
हवेतून ऑक्सिजन संकलित करून त्याद्वारे द्रवरुप ऑक्सिजनची निर्मिती या प्रकल्पात होणार असून जामखेड व कर्जत तालुका ऑक्सिजन निर्मितीत आता स्वयंपूर्ण होणार आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून वाढते संक्रमण रोखण्यासाठी विविध प्रभावी व नावीन्यपूर्ण उपाययोजना आमदार रोहित पवार राबवत आहेत. जामखेड येथे सुसज्ज जम्बो कोविड सेंटर उभारून रुग्णांना चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा पुरवित आहेत. परिणामी जामखेडसह आजूबाजूच्या तालुक्यातील रूग्णही या ठिकाणी येऊन उपचार घेत आहेत. रूग्णांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी पवार यांच्या पुढाकारातून कर्जत व जामखेडमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले असून या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या बांधकामास सुरुवातही झाली आहे.
---
कोरोना बाधित रूग्णांनाही आधार..
कर्जत-जामखेडसह आजूबाजूच्या करमाळा, परांडा, भूम, दौंड, बीड, कडा व आष्टी या भागातून देखील अनेक कोरोनाबाधित रुग्ण हे उपचारासाठी जामखेड येथे जम्बो कोविड सेंटरला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे जामखेडमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या लक्षात घेऊन रोहित पवार यांनी सद्य परिस्थितीत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी पाठपुरावा केल्याने सर्वच रूग्णांना आधार मिळाला आहे.