कर्जत : ‘मी भाजपाचीच’- सभापती साधना कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 17:46 IST2019-05-24T17:45:50+5:302019-05-24T17:46:24+5:30
आपण भाजपा-शिवसेनेच्या सहकार्यानेच कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान झाले असून आपण भाजपाचेच आहोत.

कर्जत : ‘मी भाजपाचीच’- सभापती साधना कदम
कर्जत: आपण भाजपा-शिवसेनेच्या सहकार्यानेच कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान झाले असून आपण भाजपाचेच आहोत. यापुढे पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण भाजपातच काम करणार आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्य तथा नवनिर्वाचित सभापती साधना कदम यांनी जाहीर केले. पत्रकार परिषदेत त्यांनी ही भुमिका जाहीर करत पुन्हा एकदा राष्ट्रवादीला कात्रजचा घाट दाखविला.
कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड २० रोजी पार पडण्या अगोदर एक दिवस आधी पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी भाजपात प्रवेश केलेल्या साधना कदम यांनी निवडीनंतर पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात जात सत्कार स्वीकारुन भाजपाला धक्का दिला होता. मात्र शुक्रवार २४ रोजी सभापती साधना कदम यांनी पुन्हा यु-टर्न घेत आपण सोमवारी भाजप आणि शिवसेनाच्या साह्याने सभापती झालो असल्याचे पुनरोच्चार पत्रकार परिषदेत केला.
कदम म्हणाल्या, आपण पालकमंत्री राम शिंदे यांची भेट घेत चोंडी येथे त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यासह भाजपामध्ये प्रवेश केला. २० मे रोजी सभापती निवडीसाठी शिंदे यांनी आपले नाव पुढे करत भाजपा आणि शिवसेनेच्या सदस्यांना पाठींबा देण्याची सूचना केली. त्या सुचनेनुसार सोमवारी सभापती निवडीप्रसंगी आपल्या नामनिर्देशन अर्जावर सूचक म्हणून शिवसेनेचे उपसभापती प्रशांत बुद्धिवंत तर अनुमोदन म्हणून भाजपाचे सदस्य बाबासाहेब गांगर्डे यांची स्वाक्षरी होती. एकमेव अर्ज असल्याने आपली बिनविरोध निवड झाली आहे. यापुढे आपण पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुका भाजपामध्ये व सभापती म्हणून कर्जत तालुका पंचायत समितीमध्ये काम करणार आहे. आज रोजी जलसंधारण मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पदभार स्वीकारणार असल्याचे म्हटले. सभापती निवडीच्या दिवशी मी नवीन असल्यान गैरसमज झाला, असेही कदम म्हणाल्या.
यावेळी पत्रकार परिषदेत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरिकर, तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, शहराध्यक्ष रामदास हजारे, मनीषा वडे, डॉ.कांचन खेत्रे, अंकुश कदम, रामकिसन साळवे, विक्रम राजेभोसले, विक्रांत ढोकरिकर उपस्थित होते.