कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांचा भाजपाला रामराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST2021-09-19T04:21:45+5:302021-09-19T04:21:45+5:30
कर्जत : येथील नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वासह सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण मुंडे यांच्याकडे ...

कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांचा भाजपाला रामराम
कर्जत : येथील नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वासह सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण मुंडे यांच्याकडे दिला आहे. ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. हा कर्जत तालुका भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत कर्जत तालुक्यातील एक मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. मात्र हा नेता कोण याबाबत नागरिकांमध्येही संभ्रम होता. अखेर कर्जत नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारपरिषद घेऊन भारतीय जनता पक्षाचा प्राथमिक व सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, असे जाहीर केले. त्यामुळे राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
राऊत हे गेल्या पंचवीस वर्षांपासून कर्जत ग्रामपंचायत, नगरपंचायतीच्या सत्तेत आहेत. तसेच त्यांच्या पत्नी सुवर्णा राऊत या पंचायत समितीच्या सभापती होत्या. नामदेव राऊत हे मूळचे शिवसैनिक आहेत. नंतर त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नंतर ते भारतीय जनता पक्षात गेले. भाजपमध्ये असतानाच ते नगराध्यक्ष व नंतर उपनगराध्यक्ष झाले.
आता ते आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. हा माजी मंत्री प्रा. राम शिंदे व खासदार डॉ. सुजय विखे यांना धक्का मानला जात आहे. यापूर्वी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, नगरसेवक बापूसाहेब नेटके, लालासाहेब शेळके, नगरसेविका मनिषा सोनमाळी, सामाजिक कार्यकर्ते सचिन सोनमाळी, नितीन तोरडमल आदींनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.
----
१८ नामदेव राऊत