सौरऊर्जेतून कान्हूर पठार विजेत स्वयंपूर्ण
By Admin | Updated: October 10, 2016 01:05 IST2016-10-10T00:43:58+5:302016-10-10T01:05:19+5:30
विनोद गोळे , पारनेर सौरऊर्जेतून वीजउत्पादन करण्याचा प्रकल्प पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार पतसंस्थेने राबविला असून, यातून संस्था विजेमध्ये स्वयंपूर्ण तर होणारच,

सौरऊर्जेतून कान्हूर पठार विजेत स्वयंपूर्ण
विनोद गोळे , पारनेर
सौरऊर्जेतून वीजउत्पादन करण्याचा प्रकल्प पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार पतसंस्थेने राबविला असून, यातून संस्था विजेमध्ये स्वयंपूर्ण तर होणारच, शिवाय पूर्र्णदाबाने वीजपुरवठा आल्यास ही वीज गावालाही पुरविण्यात येणार आहे. पारनेर तालुक्यासारख्या ग्रामीण भागासह राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग समजला जात आहे.
कान्हूर पठार येथे कान्हूर पठार मल्टीस्टेट संस्था आहे. राज्यासह परराज्यांतही संस्थेच्या शाखा असून, सर्व शाखांमध्ये चालणार्या आर्थिक व्यवहारांवर आॅनलाईन नियंत्रण कान्हूर पठारमधून केले जाते. त्यामुळे येथे वीजपुरवठा खंडित झाल्यास संस्थेचे राज्यभरातील कामकाज ठप्प होते. त्यात मोठे नुकसान होण्याचा धोका असतो. शिवाय ‘महावितरण’चे वर्षभराचे बिलही लाखाच्या घरात जाते. या सर्व गोष्टींवर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप ठुबे यांनी विचार करताना विजेची गरज व बचत होणे महत्त्वाचे असल्याचे आहे म्हणून सौरऊर्जेचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. सर्व संचालक मंडळानेही यास सहमती दर्शविल्यानंतर प्रत्यक्ष कान्हूर पठार पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीवर सौरऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे समाधान व्यक्त होत आहे.
कान्हूर पठार पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीवर सौर उर्जेचे बारा पॅनल बसविण्यात आले आहेत. त्यातून संस्थेला तीन किलोवॅट वीज उपलब्ध होणार आहे. यासाठी अवघा चार ते पाच लाख रूपये खर्च आला आहे. यामुळे संस्था विजेमध्ये स्वयंपूर्ण होणार असून भारनियमनातुन मुक्त होणार आहे. ग्रामीण भागातील हा पहिलाच प्रकल्प असून हा प्रकल्प पाहण्यासाठी अनेक संस्थाचे पदाधिकारी भेटी देण्यास येत आहेत.
कान्हूर पठार पतसंस्थेने विजेमध्ये स्वयंपूर्र्ण होण्यासाठी सौर ऊर्जेचा प्रकल्प उभारला आहे. होणाऱ्या वीजनिर्मितीमधून संस्थेचा विजेवरील मोठा खर्च वाचणार आहे. या प्रकल्पातून मिळणारी अतिरिक्त वीज ‘महावितरण’ला विकण्यात येणार आहे. यातूनच ‘महावितरण’ कान्हूर पठार गावाला वीजपुरवठा करू शकते. यामुळे गावालाही या सौर उर्जा प्रकल्पाचा फायदा होणार आहे.
-दिलीप ठुबे, मुख्य कार्यकारी अधिकारी, कान्हूरपठार पतसंस्था