वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे काळवीटाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 16:00 IST2017-04-04T16:00:44+5:302017-04-04T16:00:44+5:30
जखमी झालेल्या काळवीटावर उपचार सुरू असताना त्याला बाथरूममध्ये कोंडून घेतल्याने त्याचा संशयास्पद गुदमरून मृत्यू झाल्याचा प्रकार पारनेर येथे उघडकिस आला आहे.

वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे काळवीटाचा मृत्यू
आॅनलाईन लोकमत
पारनेर (अहमदनगर), दि़ ४ - जखमी झालेल्या काळवीटावर उपचार सुरू असताना त्याला बाथरूममध्ये कोंडून घेतल्याने त्याचा संशयास्पद गुदमरून मृत्यू झाल्याचा प्रकार पारनेर येथे उघडकिस आला आहे. याप्रकरणी जिल्हा वनसंरक्षक श्री लक्ष्मी यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.
पारनेर-राळेगणसिद्धी रस्त्यावर राळेगणसिध्दी नजिक दोन्ही पायाला जखम झाल्याने रविवारी एक काळवीट जखमी होऊन पडले होते. त्यास वन विभागात पशुवैद्यकीय अधिकारी गुंड यांनी काळवीटावर उपचारही केले होते. मात्र, वन विभागाने त्या काळवीटास बाथरूममध्ये कोंडून ठेवले़बाथरूममध्ये कोंडण्यात आल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान काळवीटाचा मृत्यू होऊनही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास परिसरांत दुर्गंधी पसरल्याने वन विभागाच्या मागील बाजूस राहणाऱ्या रहिवाशांनी याबाबत काही ग्रामस्थांना माहिती दिली. काही ग्रामस्थांनी सगळीकडे फिरून पाहिल्यावर वन विभागाच्या खोल्यांमध्ये हरीण आणून ठेवले आहे, तेथूनच वास येत असल्याचे लक्षात आले. यावेळी काही युवक तेथे गेल्यावर वन विभागाच्या त्या अंधाऱ्या खोलीत काळवीट मृत्यूमुखी पडल्याचे निदर्शनास आले. बाथरूममध्येच त्याला डांबल्याने तेथेच त्याचा मृत्यु झाला होता व त्यामुळे मोठी दुर्गंधी पसरली होती़ याची माहिती पारनेरमधील युवक व पत्रकारांनी जिल्हा वनसंरक्षक श्री लक्ष्मी यांना दुरध्वनीवरुन कळविली. त्यांनी याची गंभील दखल घेत तातडीने सहाय्यक वनसंरक्षक संजय कडू यांना चौकशीसाठी पाठवले.
मयत काळवीटाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण पुढे येणार आहे. परंतु सकृतदर्शनी पारनेरचे वनपरीक्षेत्र अधिकारी अनंत कोकाटे यांच्यासह काही जणांचा यात हलगर्जीपणा दिसून येत आहे. माझा अहवाल मी जिल्हा वनसंरक्षक श्री लक्ष्मी यांच्याकडे देणार आहे, असे उपवनसंरक्षक संजय कडू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वरिष्ठांपासून माहिती लपविली
रविवारी जखमी हरीण वन विभागाच्या कार्यालयात आणल्यावर त्याची माहिती तातडीने वनपरीक्षेत्र अधिकारी अनंत कोकाटे यांनी जिल्हा कार्यालयास देणे आवश्यक होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून काळवीटावर उपचार सुरू असल्याची किंवा काळवीट मृत्यू पावल्याची माहितीच कोकाटे यांनी वरिष्ठांपासून लपवून ठेवली. शिवाय सहाय्यक वनसरंक्षक संजय कडु हे सोमवारी वन विभागाच्या कार्यालयात दिवसभर असूनही त्यांनाही माहिती सांगण्यात आली नाही. मंगळवारी सकाळी पारनेरमधील युवकांनी तेथील हरणाच्या मृतदेहाची दुर्गंधी येत असल्याची माहिती दिल्यावरच आम्हाला माहिती समजल्याचे कडू यांनी सांगितले.