पूल दुरुस्तीवरून सुजित झावरे-राहुल झावरे यांच्यात कलगीतुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:22 IST2021-09-11T04:22:59+5:302021-09-11T04:22:59+5:30
पारनेर : मुसळधार पावसामुळे ढवळपुरी ते वनकुटे (ता. पारनेर) दरम्यानच्या काळू नदीवरील वाहून गेलेल्या पुलाच्या दुरुस्तीवरून जि. प. चे ...

पूल दुरुस्तीवरून सुजित झावरे-राहुल झावरे यांच्यात कलगीतुरा
पारनेर : मुसळधार पावसामुळे ढवळपुरी ते वनकुटे (ता. पारनेर) दरम्यानच्या काळू नदीवरील वाहून गेलेल्या पुलाच्या दुरुस्तीवरून जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे व वनकुट्याचे सरपंच ॲड. राहुल झावरे यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
गुरुवारी सुजित झावरे यांनी पुलावर जाऊन हे काम आपण करून घेतल्याचे सांगितले. वनकुट्याचे सरपंच ॲड. राहुल झावरे यांनी आमदार नीलेश लंके यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतमार्फत हे काम पूर्ण केल्याचा दावा केला. मागील आठवड्यात ढवळपुरी ते पळशी दरम्यानचे दोन पूल वाहून गेले होते. ॲड. राहुल झावरे यांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती देत पुलाच्या दुरुस्तीसह नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पुलाचे तात्पुरते काम करण्यात येऊन वाहतूक सुरळीत झाली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी कामावर जाऊन आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे हे काम पूर्ण झाल्याचा दावा केला
झावरे यांच्या या दाव्यावर आक्षेप नाेंंदवून वनकुट्याचे राहुल झावरे यांनी या कामाशी सुजित झावरे यांचा काहीही सबंध नसल्याचे स्पष्ट केले. आमदार नीलेश लंके यांच्या सूचनेनुसार आपण ग्रामपंचायतीमार्फत हे काम तात्पुरत्या स्वरूपात पूर्ण करून वाहतूक सुरळीत केल्याची माहिती त्यांनी दिली.
----
वनकुट्याचे सरपंच राहुल झावरे यांच्याबाबत प्रतिक्रिया देण्याएवढी त्यांची उंची नाही.
-सुजित झावरे, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, नगर
---
सुजित झावरे हे नावाला उरलेले तालुक्यातील स्वयंघोषित पुढारी आहेत. पूर्ण झालेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन फोटो सेशन करण्यात धन्यता मानत आहेत. या कामाचे केविलवाणेपणे श्रेय ते घेत आहेत.
-राहुल झावरे, सरपंच, वनकुटे