सफर सांदन दरीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 23:38 IST2016-06-05T23:31:25+5:302016-06-05T23:38:43+5:30
अकोले : भंडारदरा परिसरात पाणलोटाच्या डोंगरदरीत काजवा महोत्सवासह पर्यटक साम्रद येथील गूढरम्य सांदन दरीची सफर करण्याचा आनंद लुटत आहेत.

सफर सांदन दरीची
अकोले : भंडारदरा परिसरात पाणलोटाच्या डोंगरदरीत काजवा महोत्सवासह पर्यटक साम्रद येथील गूढरम्य सांदन दरीची सफर करण्याचा आनंद लुटत आहेत.
दर वर्षी मान्सूनच्या आगमनाची अवंता देत भंडारदरा परिसर लक्ष लक्ष काजव्यांच्या प्रकाश फुलांनी उजळून निघतो. काजव्यांची ही मय सभा पाहण्यासाठी पर्यटकांची पावले भंडारदऱ्याकडे वळली आहेत. दिवसभर सांदन दरीची सफर करायची आणि रात्री काजवे पाहायचे असा पर्यटक विकएन्ड प्लॅन सध्या अनुभवायास मिळत आहे. सध्या पाऊस नाही तेव्हा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची व्हॅली पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडते आहे. रतनगड आणि घोड्याचं पाऊल टेबल लॅड या दोन डोंगरांना जोडणारी साम्रद चिराची वाडी येथील गुढरम्य सांदन दरी आहे. केवळ पुरुषभर रुंदीची, दिड दोन हजार फुट उंचीची कातीव कातळकडा असलेली आणि अडिच ते तीन किलोमिटर लांबीची ही दरी पाहण्यासाठी पर्यटकांनी काजवा महोत्सवाची पर्वणी साधली आहे. पायात दम असणारे पर्यटक सांदन दरीचं टोक गाठतात आणि कोकणकड्याचा अनुभव घेतात. पावसाळ्यात या दरीत जाता येत नाही. दरीचा टोकाकडील भाग धोकादायक बनला असून येथे कडा कोसळण्याची भीती आहे. पाण्याचा मोठा लोट कधी येईल ते सांगता येत नाही. दरीत सायंकाळी लवकरच अंधारुन येते. अंधारामुळे खोलदरीचा अंदाज घेता येत नाही. या काळात विषारी निशाचर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर अधिक असतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी पायात बूट आणि हातात विजेरी आवश्यक असतेच. (तालुका प्रतिनिधी)