शिवसेना-राष्ट्रवादीला सत्तेत सामावून घ्यावे - पाचपुते
By Admin | Updated: December 1, 2014 14:48 IST2014-12-01T14:48:11+5:302014-12-01T14:48:11+5:30
भाजपाने स्थिर सरकार देण्यासाठी शिवसेना अथवा राष्ट्रवादीला सत्तेत सामावून घेण्याची गरज आहे, असे परखड मत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी मांडले आहे.

शिवसेना-राष्ट्रवादीला सत्तेत सामावून घ्यावे - पाचपुते
काष्टी: राज्यातील जनतेने भाजपाला पाच वर्षे सरकार चालविण्यासाठी कौल दिला आहे. स्थिर सरकार देण्यासाठी शिवसेना अथवा राष्ट्रवादीला सत्तेत सामावून घेण्याची गरज आहे, असे परखड मत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथे बोलताना केले.
भाजपाचे आमदार विजयराव काळे (शिवाजीनगर, पुणे) यांच्या काष्टीतील काष्टी सोसायटी, खुलेश्वर पतसंस्था व मातोश्री गॅस एजन्सीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात पाचपुते बोलत होते. पाचपुते पुढे म्हणाले की, राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा निर्णय घेण्याची क्षमता असलेला मुख्यमंत्री लाभला आहे. या सरकारकडून जनतेच्या मोठय़ा अपेक्षा आहेत. त्यासाठी सरकारला मनमोकळेपणे काम करावे लागेल.
डिझेल, पेट्रोलच्या किमती उतरल्या आहेत. महागाईचा रेपो कमी होऊ लागला आहे. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांमध्ये खुशीची लाट आहे. मात्र साखरेच्या किमती उतरल्या आहे. उसाला कसा भाव द्यावा? असा प्रश्न साखर कारखानदारांसमोर आहे. दूध, कापूस, भाजीपाल्याचे भाव खाली आले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात वेगळी कुजबुज सुरू झाली. शेती मालाच्या भावाबाबत सरकारने वेळीच जागृत होण्याची गरज आहे, असे पाचपुते म्हणाले.
आ. विजयराव काळे म्हणाले की, पुणे शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातील मुलांनी पुण्यात नोकरीच्या शोधात येण्यापेक्षा छोटे-छोटे व्यवसाय करण्यासाठी आपण अशा मुलांना सहकार्य करणार आहे.
यावेळी भगवानराव पाचपुते, सदाअण्णा पाचपुते, दीपक भोसले, अनिलमामा पाचपुते, आबासाहेब कोल्हटकर, सुनील दरेकर, वैभव पाचपुते आदी उपस्थित होते. प्रास्ताविक काष्टी सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठलराव काकडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)