जयंतराव, भाजपचा नाद सोडा...

By Admin | Updated: April 20, 2016 00:52 IST2016-04-20T00:04:09+5:302016-04-20T00:52:09+5:30

पतंगराव कदम यांच्या कानपिचक्या : सांगलीत रस्त्यांच्या कामास प्रारंभ

Jayantrao, release BJP's sounds ... | जयंतराव, भाजपचा नाद सोडा...

जयंतराव, भाजपचा नाद सोडा...

सांगली : भाजपची मंडळी खूप बिलंदर आहेत. कधी बाद करतील, ते कळणार नाही. म्हणूनच राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांना भाजपचा नाद सोडण्याचा सल्ला मी दिला आहे. पण, ते सारखे त्यांच्या गळ्यात गळे घालत आहेत, हे बरे नव्हे. एक दिवस ते जयंतरावांना नक्की बाद करतील. तुम्ही तरी त्यांना भाजपचा नाद सोडायला सांगा, असा सल्ला माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी व संजय बजाज यांना दिला.
सांगलीत लोकल बोर्ड कॉलनी ते शासकीय विश्रामधाम रस्ता डांबरीकरण, जाफरी स्ट्रीट ते प्रवीण एसटीडी ६० फुटी रस्ता, लक्ष्मी मंदिर ते चैत्रबन सोसायटी कॉर्नर रस्ता डांबरीकरण व खोजा शिया आशरी जमात व रोटरी क्लब आॅफ विश्रामबाग, महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येणाऱ्या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा डॉ. पतंगराव कदम, जयश्रीताई पाटील, महापौर हारुणभाई शिकलगार, सभागृह नेते किशोरदादा जामदार, उपमहापौर विजय घाडगे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय बजाज यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी डॉ. कदम बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, जयंतरावांना मी अनेक दिवसांपासून भाजपबरोबर संगत वाढवू नका, असा सल्ला दिला होता. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नसल्यामुळे जिल्ह्यात गमती-जमती सुरू आहेत. दिग्विजय सूर्यवंशी, संजय बजाज यांच्याकडे पाहत ते म्हणाले की, अरे मी तुमच्या नेत्यांना सांगून दमलो आहे. जरा जयंतरावांना भाजपचा नाद सोडा म्हणून तुम्ही तरी सांगा. भाजपची मंडळी चांगली नाहीत. गोड गोड बोलतात, पण ते त्यांच्या मनात आहे तेच करतात, असे पतंगराव म्हणताच कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. याचबरोबर महापौरांसह नगरसेवकांना महापालिका क्षेत्रातील पाणी, ड्रेनेज आणि शेरीनाल्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना दिल्या.
महापौर शिकलगार म्हणाले, गुंठेवारी भागातील रहिवासी क्षेत्रावर विकास आराखड्यात विविध आरक्षणे आहेत. ही आरक्षणे उठविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. किशोर जामदार म्हणाले की, राजकीय आकसापोटी राज्य शासनाने महापालिका क्षेत्रातील कामे सुचविण्याचा अधिकार आमदार, खासदारांना दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची कामे केली जात आहेत. हे थांबवावे, अशी मागणी केली. नगरसेविका रोहिणी पाटील यांनी स्वागत, संतोष पाटील यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)

कर्नाटकला : पाणी देण्यास तत्त्वत: मंजुरी
कर्नाटक सरकारने महाराष्ट्राकडे वारणा धरणातून चार टीएमसी पाणी देण्याची मागणी केली आहे. याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत होते. पण, त्यांची समजूत काढून वारणेतून पाणी देण्याची मागणी केली. त्यानुसार राज्य सरकारने कर्नाटकला चार टी.एम.सी. पाणी देण्याचे तत्त्वत: मान्य केले आहे. याबदल्यात कर्नाटक सरकार सोलापूर, जतला पाणी देण्यास तयार आहे, अशी माहितीही डॉ. कदम यांनी दिली.

Web Title: Jayantrao, release BJP's sounds ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.