जपानी उद्योजकांना सुप्याची उत्सुकता

By Admin | Updated: June 20, 2014 00:37 IST2014-06-20T00:29:10+5:302014-06-20T00:37:14+5:30

अहमदनगर : सुपा येथील औद्योगिक वसाहतीत उद्योग सुरू करण्यास जपानचे उद्योजक इच्छुक आहेत़ औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकताच जपान दौरा पूर्ण केला

Japanese entrepreneurs wonder about euphoria | जपानी उद्योजकांना सुप्याची उत्सुकता

जपानी उद्योजकांना सुप्याची उत्सुकता

अहमदनगर : सुपा येथील औद्योगिक वसाहतीत उद्योग सुरू करण्यास जपानचे उद्योजक इच्छुक आहेत़ औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकताच जपान दौरा पूर्ण केला असून, याविषयी जपानच्या उद्योजकांशी चर्चा झाली़ चर्चेदरम्यान जपानी उद्योजकांनी उद्योग सुरू करण्याची इच्छा अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली आहे़ त्यामुळे सुपा औद्योगिक वसाहतीला ‘अच्छे दिन येणार’ असल्याचे बोलले जात आहे़
सुपा औद्योगिक वसाहतीत विस्तारीकरणाच्या जोरदार हालचाली सुरू आहेत़ नवीन औद्योगिक धोरणानुसार शेतकऱ्यांच्या जमीनीला वाढीव दर जाहीर करण्यात आला आहे़ वाढीव दराने जमिनी खरेदी करण्याची अधीसूचना जारी करण्यात आली असून, औद्योगिक विकास महामंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत़ नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत़ काही शेतकऱ्यांनी जमिनी देण्याची तयारी दर्शविली़ तर सुमारे १५ शेतकऱ्यांनी हारकती नोंदविल्या आहेत़ त्यावर प्रशासनाकडून सुनावणी घेण्यात येत आहे़ राज्य शासन व जपानी उद्योजकांशी तसा करारही झाला आहे़ या पार्श्वभूमीवर औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी डॉ़ पी. अन्बलगन यांच्यासह नाशिक येथील कार्यकारी अधिकारी रामदास खेडकर यांनी नुकताच जपानचा दौरा पूर्ण केला़ दौऱ्यात त्यांनी तेथील निवडक उद्योजकांशी चर्चा केली़ चर्चेदरम्यान जपानी उद्योजकांनी जागा उपलब्ध करून दिल्यास उद्योग सुरू करण्याची तयारी दर्शविली़ जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन भूखंड ताब्यात आल्यास जपानी क्लस्टर सुरू होईल, अशी अपेक्षा खेडकर यांनी व्यक्त केली़
नगरच्या उद्योगाला कमालीची मरगळ आली आहे़ मोठे उद्योग बंद पडले आहेत़ त्यामुळे छोट्या उद्योजकांना काम नाही़ कामासाठी छोटे उद्योजक बड्या कंपन्यांच्या प्रतीक्षेत आहेत़ जपानी उद्योग क्लस्टर सुपा येथील औद्योगिक वसाहतीत प्रस्तावित आहे़ वरिष्ठ पातळीवर याविषयीच्या जोरदार हालचाली सुरू असून, अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे़ अधिकाऱ्यांचा पहिला दौरा पूर्ण करण्यात आला असून, जमिनी ताब्यात घेण्याची मोहीत महामंडळाने उघडली आहे़ नगर जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे़
सुपा येथील औद्योगिक वसाहतीत जपानचे क्लस्टर सुरू करण्याबाबत करार झाला आहे़ या पार्श्वभूमीवर जपानचा नुकताच दौरा केला़ यावेळी विविध उद्योजकांशी चर्चा केली असून,सुपा येथे उद्योग सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे़ त्यामुळे जपानी उद्योजकांची तयारी आहे़ केवळ शेतकऱ्यांची जागा देण्याची मानसिकता हवी़ जागा ताब्यात आल्यास मोठे उद्योग नगरमध्ये येतील़
- रामदास खेडकर, कार्यकारी अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळ

Web Title: Japanese entrepreneurs wonder about euphoria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.