जामखेड-श्रीगोंदा रस्ता बनला अपघातसाखळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 15:20 IST2018-10-17T15:20:06+5:302018-10-17T15:20:25+5:30
तालुक्यातील अरणगाव परिसरातून जाणाऱ्या जामखेड-श्रीगोंदा या मार्गावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक बनला आहे.

जामखेड-श्रीगोंदा रस्ता बनला अपघातसाखळी
सत्तार शेख
हळगाव : तालुक्यातील अरणगाव परिसरातून जाणाऱ्या जामखेड-श्रीगोंदा या मार्गावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक बनला आहे. सातत्याने होणा-या अपघातांमुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याची बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती हाती घेण्याची मागणी वाहनधारकांसह जनतेतून होत आहे.
पश्चिम महाराष्ट्राला मराठवाड्याशी जोडणाºया मुख्य रस्त्यांपैकी जामखेड-श्रीगोंदा हा प्रमुख रस्ता आहे. हा रस्ता दुपदरी करण्याची अनेक वर्षांची मागणी सरकारी दरबारी प्रलंबित आहे. निवडणूक काळातही हा मुद्दा चर्चेत असतो. पण नंतर हा प्रश्न बासनात गुंडाळून ठेवला जातो. या कर्जत-जामखेडचे प्रतिनिधीत्व करणारे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून या रस्त्याचा प्रश्न निकाली निघण्याची आशा या भागात निर्माण झाली होती. त्यानुसार हा रस्ता केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग म्हणून या रस्त्याचे काम अजूनपर्यंत होऊ शकलेले नाही.
जामखेड तालुक्यातील पाटोदा-अरणगाव या भागातून जाणाºया जामखेड-श्रीगोंदा या मार्गाची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली आहे. एका ठिकाणी तर रस्त्याच्या मधोमध अक्षरश: तीन फुटांपेक्षा मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय रत्नापूर फाटा ते अरणगावपर्यंत रस्त्याला साईडपट्टीच दिसत नाही. साईडपट्टीचा भाग दोन दोन फुटांच्या खड्ड्यांनी व्यापला आहे. साईडपट्टीला असलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक आपली वाहने रस्त्याच्या कडेला घेत नाहीत. यातूनच वाहनधारकांमध्ये हमरीतुमरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी प्रवास करणाºया वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावरून प्रवास करणाºया प्रवाशांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. कंबरदुखी, मानदुखीने अनेक प्रवाशी हैराण झाले आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने तातडीने रस्ता दुरूस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.