जेलमधून पळालेला आरोपी जेरबंद
By Admin | Updated: April 14, 2017 16:59 IST2017-04-14T16:59:06+5:302017-04-14T16:59:06+5:30
गोळीबारप्रकरणातील संगमनेर जेलमधून फरार झालेला आरोपी वेणूनाथ उर्फ पिंट्या माधव काळे (वय ३५, माळेगाव हवेली, ता. संगमनेर) यास शहर पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून पकडले.

जेलमधून पळालेला आरोपी जेरबंद
स गमनेर : गोळीबारप्रकरणातील संगमनेर जेलमधून फरार झालेला आरोपी वेणूनाथ उर्फ पिंट्या माधव काळे (वय ३५, माळेगाव हवेली, ता. संगमनेर) यास शहर पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून पकडले. तालुक्यातील तिगाव-तळेगाव परिसरातील डोंगरमाळावर शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कामगिरी केली. येथील एकता चौकात दिवसाढवळ्या बंदुकीतून गोळीबार करून एकास गंभीर जखमी करणारा आरोपी काळे हा संगमनेर कारागृहात असताना दि.५ एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजता कारागृहातील कचरा डब्यात भरण्यासाठी पोलिसांनी दरवाजा उघडला असता पळून गेला होता. गेले नऊ दिवस पोलीस त्याचा तपास करीत होते. पोलीस पथकाने संगमनेर, राहाता, कोपरगाव तालुक्यांतील सर्व माळरान पिंजून काढले. रात्रीची पाळत ठेवून सापळा रचून पोलिसांची शोधमोहीम सुरू होती. पोलिसांनी आरोपीचा भाऊ बाळासाहेब माधव काळे व बायको सुजाता वेणूनाथ काळे यांना ताब्यात घेऊन तपास केला, मात्र यश आले नाही. शुक्रवारी दुपारी पोलिसांनी वेषांतर करून तळेगाव-तिगाव परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी आरोपी पिंट्या हा मोटारसायकलवरून जाताना पोलिसांना दिसला. लागलीच त्याचा पाठलाग केला असता, मोटारसायकल टाकून तो डोंगरमाळावर पळत होता. जवळपास दीड किलोमीटर दमछाक झाल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले आणि अटक केली. या प्रकरणी निलंबित झालेल्या चार पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, विभागीय पोलीस अधिकारी डॉ. अजय देवरे यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांवरुन संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक गोविंद ओमासे, पोलीस हेड कॉन्स्टेबल ईस्माइल शेख, गोरक्ष शेरकर, पी. एन. लबडे, अंबादास पालवे, बाळासाहेब आहिरे, प्रमोद गाडेकर, सागर धुमाळ यांनी ही कामगिरी फत्ते केली. (तालुका प्रतिनिधी).....संगमनेर तालुक्यातील तिगाव-तळेगाव भागातील डोंगर माळरानावर पाळत ठेवून दीड किलोमीटर आरोपीच्या मागे धावून त्यास पकडले. पोलिसांची दमछाक झाली. पोलिसांनी आरोपीच्या बायकोस अटक केली नसती, तर आरोपी दूर परराज्यात फरार झाला असता.- गोविंद ओमासे, पोलीस निरीक्षक.