जगताप - विखे कुटुंब नगरच्या विकासासाठी एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:59+5:302021-07-14T04:23:59+5:30
अहमदनगर : एकमेकांचे पक्ष वेगळे असले तरी राजकारण बाजुला ठेवून नगर शहराच्या विकासासाठी जगताप व विखे हे कुटुंब एकत्र ...

जगताप - विखे कुटुंब नगरच्या विकासासाठी एकत्र
अहमदनगर : एकमेकांचे पक्ष वेगळे असले तरी राजकारण बाजुला ठेवून नगर शहराच्या विकासासाठी जगताप व विखे हे कुटुंब एकत्र आली आहेत. दोन सुशिक्षित राजकारणी एकत्र आल्यामुळे नगरमधील गोरगरिबांसाठी अर्बन हेल्थ सेंटर उभे राहू शकले, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी येथे सांगितले.
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज संचलित सावेडी भाजी मार्केटच्या इमारतीतील अर्बन हेल्थ सेंटरचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विखे बोलत होते. महापौर रोहिणी शेंडगे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर मालन ढोणे, सभागृहनेते रवींद्र बारस्कर, आयुक्त शंकर गोरे, माजी सभागृहनेते स्वप्नील शिंदे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, निखिल वारे, धनंजय जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माणिक विधाते आदी उपस्थित होते. विखे म्हणाले, महापालिकेची ही वास्तू दुर्लक्षित होती. या इमारतीत हेल्थ सेंटर सुरू करण्याचे काम महिनाभरापूर्वी हाती घेतले. ते आज प्रत्यक्षात साकारले आहे. या केंद्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अत्यल्प दरात आरोग्य सुविधा पुरविल्या जाणार असून, खासगी लसीकरणही सुरू केले जाणार आहे, असे विखे म्हणाले. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेत अर्बन हेल्थ सेंटरचा नगरकरांना मोठा आधार होईल, अशी अपेक्षा आमदार जगताप यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
....
महापौर निवडणूक राजकीय सेटिंग
लोकप्रतिनिधी कोणताही पक्ष नसतो. महापालिकेत सेना व राष्ट्रवादी एकत्र येतील, असे कुणालाही वाटले नव्हते. परंतु, हे दोन्ही पक्ष महापौर निवडणुकीत एकत्र आले. ही एकप्रकारे राजकीय सेटिग आहे. राजकारणात असे काही निर्णय घ्यावे लागतात, असे विखे म्हणाले.
......
जादुटोणा, लावण्या गायब झाल्या, पण कोरोना गेला नाही
जिल्ह्यातील काही कोविड केअर सेंटरमध्ये जादुटोणा झाला. लावण्या सादर झाल्या. त्या आता गायब झाल्या आहेत. परंतु, कोरोना काही गायब झाला नाही, असा टोला विखे यांनी जिल्ह्यातील नेत्यांना लगावला.
....
विकासकामांना प्राधान्य, व्हिडिओला नाही
जिल्ह्यातील काहीजण सकाळी ब्रश केल्यापासून ते आंघोळीपर्यंतचे व्हिडिओ व्हायरल करून प्रसिध्दी मिळवित आहेत. आमदार संग्राम जगताप व आपल्याला पारितोषिक मिळाले. परंतु, आम्ही त्याचा व्हिडिओ व्हायरल केला नाही. व्हिडिओ व्हायरल करण्यासारखी आमची परिस्थिती राहिलेली नाही. दाढी वाढली आहे, केस विस्कटलेले आहेत. जाहिरातींचा अतिरेक न करता विकासकामांना प्राधान्य देण्यावर भर असल्याचे विखे म्हणाले.
...
... तर बाबासाहेब वाकळे धनुष्यबाणावर महापौर असते
महापाैरपद राखीव झाले. महापौरपद खुले असते तर माजी महापौर बाबासाहेब वाकळे हे धनुष्यबाणावर पुन्हा महापौर झाले असते, असे विखे यांनी सांगताच हंशा पिकला.
...
मनपाने ५०० ऑक्सिजन बेड उभारावेत
कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. त्यासाठी महापालिकेने आतापासूनच तयारी सुरू करावी. अन्य रुग्णालयांना निधी न देता स्वत: ऑक्सिजनचे ५०० बेड उभारण्यासाठी निविदा काढाव्यात. खासगी रग्णालये ऑक्सिजनचे बेड उभारण्यासाठी पुढे येतील, असा सल्ला विखे यांनी महापालिका आयुक्तांना यावेळी दिला.
....
कामाची दखल घेऊन पंतप्रधान मंत्रिमंडळात संधी देतील
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत पत्रकारांनी विचारले असता विखे म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मंत्री व्हावा, असे वाटत असते. परंतु, प्रत्येक लोकप्रतिनिधीला संधी मिळेलच असे नाही. खासदार म्हणून जिल्ह्यात अनेक कामे केली आहेत. या कामांची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी संधी देतील, असे विखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
...
सूचना: फोटो आहे