साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी जाधव?
By Admin | Updated: September 1, 2014 00:00 IST2014-08-31T23:43:00+5:302014-09-01T00:00:20+5:30
शिर्डी : तब्बल एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर संस्थानच्या कार्यकारी अधिकारी पदी राज्य शासनाने राजेंद्र जाधव यांची नियुक्ती केल्याचे वृत्त आहे़

साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी जाधव?
शिर्डी : तब्बल एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर संस्थानच्या कार्यकारी अधिकारी पदी राज्य शासनाने राजेंद्र जाधव यांची नियुक्ती केल्याचे वृत्त आहे़ मंत्रालयात अंडर सेक्रेटरी म्हणून कार्यरत असलेले जाधव हे अपर जिल्हाधिकारी दर्जाचे असून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात येते़
वार्षिक पाचशे कोटीपर्यंत उलाढाल असलेल्या साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी पद गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे़ शिर्डीच्या प्रांताधिकाऱ्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे़ किशोर मोरे यांच्या बदलीनंतर काही महिने हा कार्यभार उपकार्यकारी अधिकारी यांच्याकडे होता़ त्यानंतर अजय मोरे यांच्याकडे व त्यांच्या बदलीनंतर आता ही जबाबदारी आता कुंदन सोनवणे यांच्याकडे आहे़ दरम्यान साईबाबा संस्थानचा वाढता व्याप लक्षात घेता संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी यासाठी येथील भाजपाचे शहराध्यक्ष राजेंद्र जगताप, माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप कुलकर्णी, संजय काळे आदींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती़ त्यावर न्यायालयाने शासनाला पंचेचाळीस दिवसात आयएएस अधिकारी नेमण्याचे आदेश दिले होते़ त्यास जवळपास शंभर दिवस उलटले असून राज्य सरकारने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे़ न्यायालयाने नुकतीच याचीकाकर्त्यांना नोटीस बजावून आपले म्हणणे चार आठवड्यात मांडण्यास सांगितले आहे़
दरम्यान शासनाने निवडणूक आचारसंहिता सुरु होण्याच्या तोंडावर जाधव यांच्या नियुक्तीचे आदेश काढल्याचे वृत्त आहे़ याशिवाय संस्थानचे विश्वस्त मंडळही नेमणुकीच्या प्रतीक्षेत असून गेल्या अडीच वर्षापासून जिल्हा प्रधान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समिती संस्थानचा कारभार पहात आहे़ (तालुका प्रतिनिधी)