अनुभव नसणाऱ्यांनी टीका करणे हास्यास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:26 IST2021-08-13T04:26:15+5:302021-08-13T04:26:15+5:30
पाथर्डी : तालुक्यातील अकोला गावातील नेतृत्व स्वत:च्या हिमतीवर व कर्तृत्वाने केंद्रीय पातळीवर गेले. त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान व आदर कायम ...

अनुभव नसणाऱ्यांनी टीका करणे हास्यास्पद
पाथर्डी : तालुक्यातील अकोला गावातील नेतृत्व स्वत:च्या हिमतीवर व कर्तृत्वाने केंद्रीय पातळीवर गेले. त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान व आदर कायम आहे. मात्र ज्यांना अद्याप सामाजिक, राजकीय कामाचा, निवडणुकीचा अनुभव नाही. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर टीका करणे हा प्रकार हास्यास्पद आहे, असा टोला आमदार मोनिका राजळे यांनी युवा नेते ऋषिकेश ढाकणे यांना नाव न घेता लगावला.
पाथर्डी तालुक्यातील खर्डे, सांगवी, पागोरी पिंपळगाव, वसूजळगाव, सुसरे येथील पावणेपाच कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन गुुरुवारी झाले. यावेळी त्या बोलत होत्या. बुधवारी ऋषिकेश ढाकणे यांनी पत्रकार परिषद घेऊन राजळे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला राजळे यांनी उत्तर दिले.
यावेळी पंचायत समिती सभापती सुनीता दौंड, भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, पंचायत समिती सदस्य विष्णूपंत अकोलकर, खर्डे गावच्या सरपंच आशा सांगळे, पागोरी पिंपळगावच्या सरपंच छाया दराडे, सांगवीच्या सरपंच सुवर्णा एकशिंगे, संदीप लोखंडे, राजेंद्र दराडे, अलीम पटेल आदी उपस्थित होते.
राजळे म्हणाल्या, दोन वर्षांपासून सत्ताधारी आणि विरोधक यातील फरक जाणवत आहे. विरोधी आमदार असल्याने राज्य सरकारकडून निधी मिळत नाही. गेल्या दीड वर्षात कुठलाच निधी मिळाला नाही. सध्या ज्या कामांचे भूमिपूजन करीत आहोत ती मागील सरकारच्या काळात मंजूर झालेली आहेत. पंकजा मुंडे मंत्री असताना त्यांनी जलयुक्त शिवार योजना सुरू केली व मोठा निधी दिला. दोन वर्षे होत आले तरी पालकमंत्र्यांनी अद्याप शासकीय समित्या केल्या नाहीत. सध्या पाऊस लांबल्याने पालकमंत्र्यांना भेटून शेतीसाठी पाण्याचे रोटेशनची मागणी करणार आहे, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक आसाराम जेधे यांनी केले. पांडुरंग सांगळे यांनी आभार मानले.
-----
१२ राजळे खेरडे
पाथर्डी तालुक्यातील खर्डे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करताना आमदार मोनिका राजळे व इतर.