अहमदनगर : समग्र शिक्षणातून विद्यार्थी घडवणे हे काम दुय्यम होत, अशैक्षणिक कामांना प्राधान्यक्रम देण्याची वेळ शिक्षकांवर शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आली आहे. सध्याच्या घडीला जिल्हा परिषद शिक्षकांना विविध सामाजिक जबाबदाऱ्यांसह अनेक अशैक्षणिक कामे करावी लागतात. खिचडी शिजविण्यापासून मुलांना वाटप करण्यापर्यंत आणि मतदानापासून मतदार यादीतील मतदार शोधण्यापर्यंत कामे शिक्षकांना करावी लागतात.
गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक अशैक्षणिक कामांतच गुरफटला गेला आहे. त्यामुळे मुलांना अध्यापन करणे हा मूळ हेतू बाजूला पडत आहे. शिक्षकाला हे कळत असले तरी अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखाली तो इतका दबला आहे की, त्याच्या तक्रारींचा आवाज शासनापर्यंत पोहोचत नाही. अनेक शिक्षक नाइलाजास्तव ही कामे करतात. निवडणूक, जनगणना, कोरोनाकाळ ही राष्ट्रीय कामे आम्ही कर्तव्य म्हणून जरूर करू; परंतु खिचडी शिजवून ती वाटणे, मतदारांची यादी तयार करणे, वर्गखोल्या बांधण्याचे नियोजन करणे, ही कामे शिक्षकांची आहेत का? असा सवाल शिक्षक उपस्थित करत आहेत.
कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून शाळांना सुटी आहे. या कालावधीमध्ये ऑनलाइन वर्ग घेतले जात आहेत. मात्र, ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्क, तसेच इतर समस्या असल्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून दूर आहेत. काही शिक्षक आपल्या परीने त्यांना शिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे अशैक्षणिक कामांची यादी द्यायची आणि दुसरीकडे त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा करायची, हे चुकीचे आहे, असा मतप्रवाह शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.
शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कार्य करून घ्यायला हवे, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल देताना कोर्टाने शिक्षण अधिकार अधिनियम २७ चा हवाला दिला आहे; परंतु याचा विचार महाराष्ट्रात झालेला दिसत नाही.
-------------
जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा - ३५७३
एकूण शिक्षक - ११,२००
----------
शिक्षकांची कामे
जनगणना, मतदार याद्या तयार करणे, मतदानाची जबाबदारी, पटनोंदणी, हत्तीपाय निर्मूलनासाठी सर्वेक्षण, वृक्षारोपण, शाळेची रंगरंगोटी, विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडणे, आधार कार्ड काढून देणे, पालकांची सभा, शाळा व्यवस्थापन समिती सभा, शाळेची ऑनलाइन माहिती भरणे, यू डायसवर माहिती भरणे, शैक्षणिक अहवाल तयार करणे, शिष्यवृत्तीबाबत माहिती भरणे, शिक्षण विभागाने मागितलेली माहिती पुरविणे, शालेय पोषण आहार वाटपाची कामे, पोषण आहारच्या नोंदी ठेवणे, धान्यसाठा नोंदविणे, धान्य, साहित्याची मागणी, शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे, विद्यार्थ्यांना धान्य वितरण करणे, प्रत्येक राष्ट्रीय कामात मदत करणे, सध्या कोरोनामुळे रस्त्यांवरही शिक्षकांना तपासणीसाठी कामावर लावण्यात आले होते.
--------------
एकशिक्षकी शाळेचे हाल
ज्या शाळेमध्ये केवळ एक शिक्षक आहे, त्या शाळेमध्ये तर शिक्षकांचे हाल होत आहेत. विद्यार्थ्यांना सांभाळण्यापासून ते अशैक्षणिक कामे करताना त्यांची दमछाक होत आहे.
----------------
शिक्षक हा मुलांच्या गुणवत्तेसाठी असतो; परंतु हल्ली तो महसूलपासून सर्वच विभागांची अशैैक्षणिक कामे करतो. लहान मुलांसमोर शिक्षक नसतील, तर त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. जनगणना, निवडणूक ही राष्ट्रीय कामे ठीक आहेत; परंतु इतर कामे शिक्षकांवर लादू नयेत.
-संजय कळमकर, शिक्षक नेते, गुरुकुल मंडळ
--------------
शिक्षकांना अवांतर दिलेल्या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते. सध्या कोरोनाकाळ असल्यामुळे शाळा बंद आहेत. सुटीत कोरोनाची अनेक कामे शिक्षकांनी केली. मात्र, आता शाळा सुरू झाल्याने आता ही कामे शिक्षकांना देऊ नयेत.
-प्रवीण ठुबे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक परिषद
---------------