पाणीपुरवठा विस्कळीत करण्याचा अधिकाऱ्यांचाच खोडसाळपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:26 IST2021-08-13T04:26:09+5:302021-08-13T04:26:09+5:30
अहमदनगर : शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा जाणीवपूर्वक विस्कळीत करण्याचा खोडसाळपणा अधिकारी करत असल्याचा आरोप नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे यांनी सभागृहात ...

पाणीपुरवठा विस्कळीत करण्याचा अधिकाऱ्यांचाच खोडसाळपणा
अहमदनगर : शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा जाणीवपूर्वक विस्कळीत करण्याचा खोडसाळपणा अधिकारी करत असल्याचा आरोप नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे यांनी सभागृहात केला. तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या प्रस्तावाचा शासनाला पाठविण्याचे यावेळी ठरले.
शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून महापालिकेची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. सभेच्या सुरुवातीला सेनेचे नगरसेवक गणेश कवडे यांनी शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला. धरण उशाला आणि कोरड घशाला, अशा शब्दात कवडे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. निर्मलनगर भागातील पाणीपुरवठा दीड महिन्यांपूर्वी सुरळीत होता. परंतु, गेल्या महिनाभरापासून विस्कळीत झाला आहे. पाणीपुरवठा विस्कळीत करण्याचा खोडसाळपणा प्रशासनाकडून केला जात आहे, गंभीर आरोप विनीत पाऊलबुद्धे यांनी केला. त्यावर प्रशासनाकडून जलभियंता परिमल निकम यांनी खुलासा केला. परंतु, पाऊलबुद्धे यांचे समाधान झाले नाही. त्यांनी थातूर-मातूर उत्तर देऊन सभागृहाची दिशाभूल करू नका. मागील दोन महिन्यांपासून पाणीपातळी चांगली होती. मग अचानक पाणीपातळी कमी कशी झाली. कर्मचाऱ्यांकडे विचारणा केल्यास तुम्ही इकडे येऊ नका, असे सांगितले जाते. याचा अर्थ काही गडबड आहे. अधिकाऱ्यांकडून लपवाछपवी सुरू आहे. औरंगाबादरोडवरील अनधिकृत नळकनेक्शन तोडण्याबाबत चर्चा झाली होती. परंतु, दीड महिना उलटूनही त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत बैठक होऊन निर्णय होत नसेल तर हा आमदारांचा अवमान आहे, असे पाऊलबुद्धे म्हणाले. अन्य सदस्यांनी उभे राहत जाणीवपूर्वक अधिकारी पाणीपुरवठा विस्कळीत करत असल्याचे सांगत कारवाईची मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत, रवींद्र बारस्कर, सभापती अविनाश घुले, अनिल शिंदे, कुमार वाकळे आदींनी सहभाग घेतला.
....
११२ नळ अनधिकृत
सध्या उड्डाणपुलाखालील जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना ११२ नळकनेक्शन अनधिकृत असल्याची बाब सभापती अविनाश घुले यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. यावरून शहरातील अनधिकृत नळ कनेक्शनचा शोध घेऊन पाणीपट्टी अकारणीची मागणी अनिल शिंदे यांनी केली.
......
जुन्या इमारतींचे परवाने तुम्हीच शोधून द्या
स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी केडगाव येथील अनधिकृत इमारतधारकांना दिलेल्या नोटिसींचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. ग्रामपंचायत असताना पुणेरोडवर दुकाने बांधली गेली. त्यांना आता नोटिसा पाठविण्यात आल्या असून, दुकानदारांचे म्हणणे प्रशासन ऐकून घेत नाही, अशी तक्रार कोतकर यांनी केली. त्यावर उपमहापौर गणेश भोसले यांनी जुने परवाने नागरिकांकडे नाहीत. ते तुम्ही शोधून द्या त्यानंतर कारवाई करा, असा आदेश दिला.
....