पैसे दुप्पटच्या आमिषाने गुंतवणूकदारांना एक कोटीचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 18:05 IST2017-08-20T18:05:24+5:302017-08-20T18:05:24+5:30
जनसहारा अॅग्रो सोसायटी घोटाळा: कंपनीच्या अध्यक्षांसह संचालकांवर गुन्हा

पैसे दुप्पटच्या आमिषाने गुंतवणूकदारांना एक कोटीचा गंडा
अहमदनगर : सहा वर्षांत दुप्पट पैसे देण्याच्या आमिषाने विविध योजनातंर्गत गुंतवणूकदारांची तब्बल १ कोटी ४ लाख ६७ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जनसहारा मल्टीस्टेट अॅग्रो पर्पज को. आॅप सोसायटीच्या अध्यक्षांसह संचालक अशा नऊ जणांविरोधात येथील कोतवाली पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे़
पैशाची फसवणूकप्रकरणी दत्तात्रय अप्पाजी दहिफळे (वय ५० रा़ महिदा ता़ आष्टी जि़ बीड) यांनी फिर्याद दाखल केली असून, जनसहारा मल्टीस्टेट अॅग्रो पर्पज को. आॅप सोसायटीची अध्यक्षा वंदना सिंग कुशवाह (रा़शहापुरा, भोपाळ, मध्यप्रदेश), संचालक निर्मला सोनी (रा़ काला पिपल मंडी जि़ शहापूर, मध्यप्रदेश), जसपालसिंग संदू (ग्वाल्हेर, मध्यप्रदेश), नरंजन सक्सेना, प्रेम गिबनरे, विवेक माधुर, मयेक जोहरी, सुधीर पाल व मनविरसिंग (सर्व रा़भोपाळ, मध्यप्रदेश) यांच्यावर कलम ४२०, ४०९,१२० ब, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
जनसहारा मल्टीस्टेट अॅग्रो पर्पज को आॅप सोसायटीचे येथील मार्केटयार्ड येथील हमाल पंचायत भवन, पहिला मजला येथे कार्यालय आहे़ या कंपनीच्या विविध योजनांच्या माध्यमातून सहा वर्षांत दुप्पट पैसे मिळतील असे गुंतवणूकदारांना आमिष दाखविले़ कोणत्या योजनेतंर्गत पैसे भरले असता पैसे परत कधी मिळणार आणि किती मिळणार याचे गुंतवणूकदारांना प्रमाणपत्रही दिले़ मात्र मुदत संपूनही पैसे न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याची बाब गुंतवणूकदारांच्या लक्षात आली़ याप्रकरणी दहिफळे यांनीच फिर्याद दाखल केली आहे़ या कंपनीत आणखी अनेक जणांनी पैसे गुंतविले असून, त्यांचीही अशाच पद्धतीने फसवणूक झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, पोलीस या कंपनीचे अध्यक्ष, संचालक यांचा शोध घेत आहेत़